मुंबईवर जलसंकट! मे महिन्यात पाणीबाणीची चिंता; धरणांतील पाणीसाठा २० दिवसांनी घटला

१२० किलोमीटर अंतरावरून मुंबईची तहान भागवणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० दिवसांचा पाणीसाठा कमी असल्याने मुंबईला जलसंकटाची चाहूल लागली आहे
मुंबईवर जलसंकट! मे महिन्यात पाणीबाणीची चिंता; धरणांतील पाणीसाठा २० दिवसांनी घटला

मुंबई : १२० किलोमीटर अंतरावरून मुंबईची तहान भागवणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यात घट झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २० दिवसांचा पाणीसाठा कमी असल्याने मुंबईला जलसंकटाची चाहूल लागली आहे. एप्रिल-मे महिन्यात पाण्याच्या मागणीत वाढ होत असल्याने धरणातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याने मे महिन्यात पाणीबाणी परिस्थितीची चिंता पालिकेला सतावत आहे.

बदलत्या हवामानामुळे पाऊसही लहरी झाला आहे. त्यामुळे ७ जूनपासून बरसणारा पाऊस आता लांबणीवर पडत आहे. गेल्या वर्षी पावसाने धरण क्षेत्राकडे पाठ फिरवल्याने १ जुलै २०२३ पासून मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली होती. परंतु धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसल्याने ८ ऑगस्टपासून पाणीकपात रद्द करण्यात आली होती. २०२२ मध्येही १० टक्के पाणीकपात केली होती. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. मार्च, एप्रिल व मे हे तीन महिने उन्हाळी असून, या तीन महिन्यांत पाण्याच्या पातळीत आणखी घट होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जून महिन्यात पावसाने धरणात वेळीच हजेरी न लावल्यास पाणीबाणी परिस्थिती ओढवू शकते. त्यामुळे महापालिकेच्या जल विभागाकडून आतापासून नियोजन करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मोडकसागर मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत ऑक्टोबर अखेरपर्यंत १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. परंतु १२ फेब्रुवारी रोजी सातही धरणांत ७ लाख २२ हजार ६ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असल्याने आतापासून मुंबईवर पाणीकपातीचे वारे वाहू लागले आहेत.

तीन वर्षांत १२ ऑगस्टची स्थिती

२०२३ - ७२२००६ (४९.८८ टक्के)

२०२२ - ७९९२७९ (५५.२२ टक्के)

२०२१ - ८३४०७९ (५७.६३ टक्के)

सध्याचा जलसाठा (दशलक्ष लिटर) (टक्के)

अप्पर वैतरणा १८९८९० (८३.६३ टक्के)

मोडक सागर ५६१९७ (४३.५९ टक्के)

तानसा ८३९६३ (५७.८७ टक्के)

मध्य वैतरणा १७१२० (८.८५ टक्के)

भातसा ३५३७३१ (४९.९८ टक्के)

विहार १६३५१ (५९.०३ टक्के)

तुळशी ४७५४ (५९.०८ टक्के)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in