पाणीसंकट! ५ मार्चपर्यंत मुंबई, ठाणे, भिवंडीत पाणीकपात; पिसे केंद्रातील २० पैकी १५ पंपच कार्यान्वित

ठाणे जिल्ह्यातील पिसे येथील पम्पिंग स्टेशनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ट्रान्सफार्मरला सोमवारी सायंकाळी आग लागली. यामुळे विक्रोळी, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, कुलाबा, भायखळा आदी भागात १०० टक्के पाणीसाठा खंडित झाला होता....
पाणीसंकट! ५ मार्चपर्यंत मुंबई, ठाणे, भिवंडीत पाणीकपात; पिसे केंद्रातील २० पैकी १५ पंपच कार्यान्वित

मुंबई : ठाणे जिल्ह्यातील पिसे येथील पम्पिंग स्टेशनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे ट्रान्सफार्मरला सोमवारी सायंकाळी आग लागली. यामुळे विक्रोळी, घाटकोपर, भांडुप, मुलुंड, चेंबूर, कुलाबा, भायखळा आदी भागात १०० टक्के पाणीसाठा खंडित झाला होता. तर पूर्व व पश्चिम उपनगरात ३० टक्के पाणीकपात करण्यात आली होती. पालिकेच्या जल विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून २० पैकी १५ पंप कार्यान्वित झाले आहेत. ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ५ मार्चपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती पालिकेच्या जल विभागाचे प्रमुख अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली. दरम्यान, उर्वरित ५ पंपाचे काम पूर्ण होईपर्यंत मुंबईसह ठाणे, भिवंडीत ५ मार्चपर्यंत १५ टक्के पाणी कपात करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जलउदंचन केंद्रात ट्रान्सफार्मरला सोमवारी सायंकाळी लागलेली आग रात्री दहा वाजता विझवण्यात यश आले. त्यानंतर रात्री ११ वाजताच्या सुमारास एक ट्रान्सफार्मर सुरू करुन त्यावर हळूहळू आठ पंप सुरू करण्यात आले. मंगळवार पहाटे चार वाजेपासून पांजरापूर येथील जलशुद्धीकरण केंद्रातील सुमारे आठ पंप सुरू करण्यात आले. तर, सकाळी नऊ वाजेपासून पूर्व उपनगरे आणि शहर विभागातील गोलंजी, रावळी, फॉसबेरी व भंडारवाडा सेवा जलाशयातून कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. त्यानंतर सकाळी ११ वाजता दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरची पाहणी करून तोही सुरू करण्यात आला व त्यावर पिसे उदंचन केंद्रातील इतर सात पंप हळूहळू सुरू करण्यात आले. अशा रितीने सद्यस्थितीत पिसे केंद्रातील २० पैकी सुमारे १५ पंप कार्यरत झाल्याने हळुवार पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. दरम्यान, या केंद्रातील उर्वरित पंप कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच परिरक्षणाखाली असलेला तिसऱ्या ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करून तो कार्यान्वित करण्यासाठी ५ मार्चपर्यंतचा कालावधी अपेक्षित आहे.

पिसे उदंचन केंद्रासह पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. महानगरपालिकेद्वारे होणारा एकूण पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याने मंगळवार मध्यरात्रीपासून ५ मार्चपर्यंत संपूर्ण मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे यामध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येत आहे. तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात येत आहे.

डोंगराळ भागात अपुरा पाणीपुरवठा

या पाणी कपातीमुळे विभागातील पाणीपुरवठ्याच्या शेवटच्या टोकाचा भाग व डोंगराळ उंचीवरील भाग यास थोड्या अधिक प्रमाणात अपुरा पाणीपुरवठा जाणवू शकतो.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in