पुढील १७ वर्षांत पाण्याच्या मागणीत दुपटीने वाढ; २०४१ मध्ये ६ हजार ५३४ दशलक्ष लिटर पाण्याची गरज

आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून, लोकसंख्येत ही झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईच्या गरजाही वाढल्या आहेत.
पुढील १७ वर्षांत पाण्याच्या मागणीत दुपटीने वाढ; २०४१ मध्ये ६ हजार ५३४ दशलक्ष लिटर पाण्याची गरज
Published on

मुंबई : ‘पाणी अनमोल आहे, पाणी नाही तर जीवन नाही’, ही म्हण आता प्रत्यक्षात खरी होत आहे. कारण मुंबईच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असून, पुढील १७ वर्षांत पिण्याच्या पाण्याच्या मागणीत दुपटीने वाढ होणे स्वाभाविक आहे. सद्यस्थितीत मुंबईची रोजची तहान भागवण्यासाठी दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. परंतु २०४१ म्हणजेच १७ वर्षांत ६ हजार ५३५ दशलक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची गरज भासणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, असे आवाहन पालिकेच्या जल विभागाकडून वेळोवेळी करण्यात येत आहे.

आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असून, लोकसंख्येत ही झपाट्याने वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईच्या गरजाही वाढल्या आहेत. सद्यस्थितीत मुंबईची लोकसंख्या १ कोटी २९ लाख ६७ हजार ९९६ इतकी आहे. हीच लोकसंख्या २०४१ मध्ये १ कोटी ७२ लाखांवर पोहोचले, असा अंदाज मुंबई महापालिकेने वर्तवला आहे. लोकसंख्येत वाढ होताच रोजच्या पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होऊन ६,५३५ दशलक्ष लिटर होईल. सद्यस्थितीत पाणीपुरवठा होण्याच्या तुलनेत ही मागणी दुपटीने वाढले, असा अंदाज मुंबई महापालिकेने व्यक्त केला आहे.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. परंतु गेल्या काही वर्षांत वातावरणीय बदलामुळे पाऊस लहरी झाला आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत नसल्याने मुंबईवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे. त्यात लोकसंख्येत झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता पिण्याच्या पाण्याच्या मागणीत वाढ होणे अपेक्षित असून, ही सर्वांसाठी चिंतेची बाब आहे.

पाणी गळती व चोरीमुळे ९०० दशलक्ष लिटर पाणी वाया

मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असला तरी प्रत्यक्षात ९०० दशलक्ष लिटर पाणीचोरी व गळतीमुळे वाया जाते. त्यामुळे मुंबईला दररोज ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.

‘या’ प्रकल्पांवर मुंबई निर्भर!

भविष्यात पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता गारगाई प्रकल्पातून ४०० ४४० दशलक्ष लिटर प्रतिदिन, पिंजाळ प्रकल्पातून ८६५ दशलक्ष लिटर प्रतिदिन, दमणगंगा पिंजाळ नदी जोड प्रकल्पातून १,५८६ दशलक्ष लिटर प्रतिदिन पाणी उपलब्ध होण्यासाठी पाणीपुरवठा प्रकल्प यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे पालिकेच्या जल विभागाकडून सांगण्यात आले. दरम्यान, हे सगळे प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित झाल्यानंतर मुंबईला आणखी २,८९१ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध होईल, असे जल विभागाकडून सांगण्यात आले. मात्र हे प्रकल्प मार्गी लागण्यास वेळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मुंबईकरांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाणी जपून वापरावे, असे आवाहन नेहमी करण्यात येते.

पाणी प्रकल्पांवर खर्च सुरूच राहणार?

मुंबईत ज्या वेगाने पुनर्विकास सुरू आहे ती पाहता भविष्यात बांधकामे वाढणार आहेत. पर्यायाने लोकसंख्येत वाढ होत राहणार. तेव्हाही अतिरिक्त पाणी आणायचे कुठून हा प्रश्न निर्माण होणार आहे. म्हणजे काही वर्षांनंतर कोट्यवधी रुपये पाणी प्रकल्पांवर खर्च करणे अटळ असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

logo
marathi.freepressjournal.in