
मुंबई महानगरपालिकेच्या ‘सर्वांना पाणी’ या योजनेमुळे आरेतील रॉयल पाम, एसआरए, आदिवासी व बिगर आदिवासींना पिण्याचे पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जोगेश्वरी विधानसभेचे शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी यासंदर्भात रॉयल पाम येथे बैठक घेऊन येथील रहिवाशांना लवकरच पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबई महानगरपालिकेच्या ‘सर्वांना पाणी’ या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. इतकी वर्षे तांत्रिक कारणांमुळे अडकलेल्या ज्या इमारतींना तसेच झोपडपट्टींना पिण्याचे पाणी मिळालेले नाही, अशा सर्व इमारतींना तसेच झोपड्यांना मानवतेच्या दृष्टिकोनातून सर्वांना पाणी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या योजनेच्या माध्यमातून जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील ज्या इमारती तसेच झोपडपट्ट्यांना पिण्याचे पाणी मिळालेले नाही, त्यांच्यासाठी वायकर यांनी बैठक घेतली.
आरेतील रॉयल पाम वसाहतीच्या विकासकाने अनेक इमारती उभारल्या; परंतु या इमारतीतील रहिवाशांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून न दिल्याने गेली १० वर्षांपेक्षा जास्त काळ पिण्याच्या पाण्यासाठी आरेतील एसआरए व रॉयल पाम येथील रहिवासी संघर्ष करत आहेत. तीच परिस्थिती येथील आदिवासी व बिगर आदिवासी रहिवाशांची आहे. येथील सोसायट्यांना तसेच आदिवासी व बिगर आदिवासी पाड्यांना पिण्याचे पाणी देण्यात यावे, यासाठी त्यांनी वायकर यांना निवेदनही दिले होते.
पिण्याच्या पाण्याची लाईन सोसायटीच्या दारापर्यंत आणून देण्याची जबाबदारी ही मुंबई महानगरपालिकेची असल्याचे स्पष्ट करत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार ही योजना राबविण्यात येत असल्याची माहिती वायकर यांनी रहिवाशांना दिली. पालिकेच्या नियमानुसार प्रत्येक सदस्याला १३५ लिटर इतके पाणी देण्यात येणार असल्याचे माहिती देतानाच, रॉयल पाम येथील वसाहतीमध्ये ज्या सुविधा विकासकाने देणे अपेक्षित होते, त्या सुविधा विकासकाकडून पूर्ण करण्यात येत नाही, तोपर्यंत त्याला पुढील कुठल्याही कामांसाठी परवानगी देण्यात येऊ नय, अशा सूचना वायकर यांनी सहाय्यक आयुक्तांना केल्या आहेत.