अंधेरी ओशिवरा येथे जलवाहिनी फुटली

रस्ता खचला, हजारो लिटर पाणी वाया
अंधेरी ओशिवरा येथे जलवाहिनी फुटली

मुंबई : अंधेरी ओशिवरा येथे पाणीपुरवठा करणाऱ्या बाराशे व्यासाची जलवाहिनी बुधवारी २.५० वाजण्याच्या सुमारास फुटली. जलवाहिनी फुटल्याने लोखंडवाला मील्लत नगर येथील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून, युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे पालिकेच्या जल विभागाचे प्रमुख अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले. दरम्यान, जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. तर पाण्याच्या फोर्समुळे रस्ता खचल्याने बस मार्ग बदलण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी ब्रिटीशकालीन असून, त्या जीर्ण झाल्या आहेत. अंधेरी ओशिवरा परिसरात तानसा जल वाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. बुधवारी दुपारी २.५० वाजण्याच्या सुमारास इन्फिनिटी मॉलच्या समोर ओशवीरा अंधेरी पश्चिम येथील बाराशे व्यासाची जलवाहिनी फुटली. ही पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. दरम्यान, जल विभागाची मेंटेनन्स टीम घटनास्थळी दाखल झाली असून, युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. जलअभियंता खात्याच्या आणि विभाग कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी घटनास्थळी धाव घेत दुरुस्ती कार्य युद्धपातळीवर हाती घेतल्याचे माळवदे यांनी सांगितले. दरम्यान, दुरुस्ती कार्य पूर्ण होईपर्यंत लोखंडवाला संकुल परिसर, मिल्लत नगर, सरदार वल्लभ भाई पटेल नगर आणि म्हाडा या परिसरास पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

रस्ता खचल्याने बस मार्गात बदल

आई तुळजा भवानी चौक येथील लायनसोल या मार्गावर पाण्याची पाईपलाईन फुटल्यामळे रस्ता खचल्याने रस्ता दुरुस्तीचे काम चालू आहे. यासाठी सायंकाळी ४.३० पासून बसमार्ग क्रमांक २४२ ही बस आदर्श नगर मार्गे मिल्लत नगर कडे आणि बसमार्ग एक २३५ ही बस शिवमंदिर रोड मार्गावरून अंधेरी (प ) कडे परावर्तित करण्यात आली आहे, तर आई तुळजा भवानी बस थांबा आणि हायलॅड पार्क बस थांबा अप /डाऊन काम पूर्ण होईपर्यंत रद्द करण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in