डोंगराळ भागातील पाणीसमस्या दूर होणार

अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा या तक्रारी येत असतात
डोंगराळ भागातील पाणीसमस्या दूर होणार

कमी दाबाने पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा या तक्रारी विशेषतः उपनगरातील डोंगराळ भागातून अधिक प्राप्त होतात. डोंगराळ भागातील पाणीपुरवठ्याची समस्या दूर करण्यासाठी आता पाणी व्यवस्थेचे सर्वेक्षण (टोटल स्टेशन सर्व्हे) करण्यात येणार आहे. पालिकेच्या जल विभागाच्या या निर्णयामुळे कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी या डोंगरभागातील पाणी वितरणाची समस्या दूर होणार आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये वर्षभराचा पाणीसाठा उपलब्ध असला, तरी अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणीपुरवठा या तक्रारी येत असतात. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या ब्रिटिशकालीन असून जीर्ण झाल्या आहेत, तर काही ठिकाणी जलवाहिन्यांना भूमिगत गळती लागली आहे. त्याचा फटका नागरिकांना बसतो आहे. त्यावर उपाययोजना करण्यासाठी पालिकेने शहर आणि पूर्व-पश्चिम उपनगरातील जलवाहिन्या बदल आणि दुरुस्तीची कोट्यवधी रुपयांची कामे घेतली आहेत. या तक्रारींसोबतच पूर्व आणि पश्चिम उपनगरातील नगरसेवकांनी डोंगरभागातील वस्त्यांमध्ये पुरेसे पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी वेळोवेळी स्थायी समिती आणि पालिका सभागृहात केल्या आहेत.

पश्चिम उपनगरात अंधेरी, मालाड तर पूर्व उपनगरात कुर्ला, साकीनाका, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, चेंबूर या डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. त्यावर उपाय म्हणून कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी या डोंगरभागात राहणाऱ्या परिसराचे पाणीपुरवठा आणि वितरण व्यवस्थेचे सर्वेक्षण केले जाणार आहे. डोंगराळ भागात पालिकेने जलवाहिन्यांचे जाळे मोठ्या प्रमाणात निर्माण केले आहे.

असा होणार सर्वेक्षणाचा फायदा

जलवाहिन्यांचे नकाशे अद्ययावत करणे, तसेच जलवाहिन्यांवरील झडपा व छेद जोडण्या यांची इत्थंभूत माहिती एकत्रित करणे.

यासाठी जीआयएस प्रणाली अद्ययावत करण्यावर भर दिला जातो. अस्तित्वातील जलवितरण व्यवस्थेचा अभ्यास करून सध्याची व भविष्यातील पाण्याची मागणी लक्षात घेऊन आवश्यक जलवाहिन्या, जोडण्यांचे प्रयोजन करणे.

पाण्याच्या समान वाटपासाठी व जलवितरण व्यवस्थेतील पाण्याच्या दाबाचे नियमन करण्यासाठी दाब नियंत्रक झडपांवर प्रवाह मापके बसविणे.

गळती अन्वेषण व दुरुस्ती यासाठी प्रयत्न करून गळती आटोक्‍यात आणणे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in