भांडूप संकुल येथे जलशुद्धीकरण प्रकल्प: दोन हजार दशलक्ष लीटर पाणी होणार शुद्ध; अश्विनी भिडे यांची माहिती

मुंबईकरांचे जीवनमान सुखकर, सुसह्य करण्यासाठी पालिकेकडून होत असलेले प्रयत्न कायम राहतील.
भांडूप संकुल येथे जलशुद्धीकरण प्रकल्प: दोन हजार दशलक्ष लीटर पाणी होणार शुद्ध; अश्विनी भिडे यांची माहिती

मुंबई : स्वस्त व शुद्ध पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई महापालिकेने भांडुप संकूल येथे दोन हजार दशलक्ष लिटर क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याबाबत नियोजन असल्याचे मुंबई महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक (प्रभारी) अश्विनी भिडे यांनी सांगितले. पालिका मुख्यालयात शुक्रवारी सकाळी अश्विनी भिडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

मुंबईकरांचे जीवनमान सुखकर, सुसह्य करण्यासाठी पालिकेकडून होत असलेले प्रयत्न कायम राहतील. मुंबईचे पालकत्व सांभाळताना पायाभूत सुविधा विकासासाठी महानगरपालिकेने अत्याधुनिक, भव्य प्रकल्प हाती घेतले आहेत. नागरी सेवा-सुविधांमध्ये आधुनिकीकरण व अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग पालिकेने अवलंबला आहे.

पालिकेच्या या प्रयत्नांमध्ये एक नागरिक या नात्याने समस्त मुंबईकरांचा यापुढेही लोकसहभाग मिळावा, सहकार्य मिळावे, जेणेकरुन प्रजासत्ताक संकल्पनेला पूर्ण अर्थ प्राप्त होईल, अशी भावना आश्विनी भिडे यांनी व्यक्त केली.

त्या म्हणाल्या की, आपल्या देशाची लोकशाही बळकट राखण्यात आणि विकासाची प्रक्रिया तळागाळापर्यंत, समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करण्यात आलेल्या रचनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबई महानगरपालिकेचे देशातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अग्रगण्य स्थान आहे. वाहतूक व्यवस्थेत आमुलाग्र क्रांती घडवून आणणारा आणि मुंबईकरांच्या जीवनशैलीवर सकारात्मक परिणाम करणारा मुंबई किनारी रस्ता यंदा कार्यान्वित होईल. उत्तर मुंबईपर्यंत वाहतूक वेगवान व्हावी म्हणून वर्सोवा ते दहिसर किनारी रस्ता आणि त्यापुढे दहिसर ते मिरा-भाईंदर उन्नत मार्ग, गोरेगाव-मुलूंड हे प्रकल्प पालिकेकडून नियोजित आहेत. मुंबईतील सर्व रस्ते खड्डे मुक्तीसाठी पालिकेने रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण व्यापक स्तरावर सुरु केले आहे. वेगवेगळ्या पुलांची कामे प्रगतीपथावर आहे. पिण्याच्या पाण्याची वाढती मागणी व पुरवठ्यातील तफावत कमी करण्यासाठी महानगरपालिकेने प्रयत्न सुरु केले आहेत. पालिकेने सुरू केलेली 'सखोल स्वच्छता मोहीम' अर्थात डीप क्लीन ड्राइव्ह लोकसहभागातून एक चळवळ बनली आहे. घनकचरा व्यवस्थापनात लोकसहभागाच्या उद्देशाने स्वच्छता दूत नेमण्यात येत आहेत. स्वच्छतेच्या तक्रारींचे जलद, परिणामकारक निवारण करण्यासाठी सुरू केलेल्या ''मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई'' या हेल्पलाईनद्वारे आतापर्यंत १० हजारांहून अधिक तक्रारींचा विक्रमी वेळेत निपटारा करण्यात आला असून या कामगिरीसाठी 'ईटी गव्हर्मेंट डिजीटेक अवॉर्डस' स्पर्धेमध्ये पालिकेला सुवर्णपदक प्राप्त झाले, ही महानगरपालिकेसाठी गौरवाची बाब असल्याचे भिडे यांनी नमूद केले.

दरम्यान, या सोहळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका सुरक्षा पथक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी शिस्तबद्ध पथसंचलन करत मानवंदना दिली. तर, संगीत कला अकादमीच्या चमूने देशभक्तीपर गीते गायली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in