पाण्याची बचत काळाची गरज !

भविष्यात रोजच्या पाणीपुरवठ्याच्या मागणीत वाढ होण्याचे संकेत वाढत्या लोकसंख्येमुळे मिळू लागले आहेत.
पाण्याची बचत काळाची गरज !

वातावरणीय बदलामुळे पावसाची धरण क्षेत्राकडे पाठ ही मुंबईकरांसह मुंबई महापालिकेसाठी चिंतेचा विषय आहे. आजच्या घडीला मुंबईची तहान भागवण्यासाठी दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असला, तरी भविष्यात रोजची पिण्याच्या पाण्याची गरज पाच हजार दशलक्ष लिटरपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे समुद्राचे पाणी गोडे करणे, सांड पाण्यावर प्रक्रिया याकडे पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले पाहिजे. रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणे, आपली जबाबदारी आहे. आजचे नियोजन, उज्ज्वल भविष्य हे समजून घेणे गरजेचे आहे. पाणी हा प्रत्येक व्यक्तीचा मूलभूत अधिकार असून, मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी रोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो.‌ भविष्यात रोजच्या पाणीपुरवठ्याच्या मागणीत वाढ होण्याचे संकेत वाढत्या लोकसंख्येमुळे मिळू लागले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळत पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाबरोबर मुंबईकरांनी पुढे येणे गरजेचे आहे.‌ रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबईकरांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच समुद्राचे पाणी गोडे करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य उपलब्ध करणे यासाठी पालिका प्रशासनाने नियोजनबद्ध प्रयत्न केले, तर भविष्यात पाणीबाणी परिस्थिती ओढावणार नाही, याचा विचार प्रशासनासह तुम्ही आम्ही करणे गरज झाली आहे.

भविष्यातील पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता राज्य सरकारने रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणे सक्तीचे केले. पावसाने पाठ फिरवली की, रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची आठवण होते. सद्य:स्थितीत मुंबईला ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असला, तरी यापैकी ९०० दशलक्ष लिटर पाणीगळती व चोरीमुळे वाया जाते, असे पालिकेच्या जलविभागाने याआधी दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

भविष्याचा विचार करत पाणीगळती व चोरी रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कठोर पाऊल उचलणे, हीच अपेक्षा मुंबईकरांची. पाणी नळाला येतंय म्हणून हवा तसा वापर करत पाणी वाया घालवण्यात अनेक जण धन्यता मानत असावेत; मात्र भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा गरज पाहता आतापासून पिण्याच्या पाण्याची बचत न केल्यास भविष्यात पाण्यासाठी वादविवाद होणार यात दुमत नाही. त्यामुळे पाणी आहे, तर जीवन आहे, याचा विचार मनात आणत पाण्याची बचत करणे आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे.

यंदाच्या वर्षी ही मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात जून महिन्यात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे मुंबईवर १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. जुलैच्या पहिल्या आठवड्यानंतर वरुणराजाने तलाव क्षेत्रात दमदार हजेरी लावल्यानंतर पाणीकपातीच्या संकटातून मुंबई सावरली; मात्र वातावरणीय बदल लक्षात घेता पाणीकपातीचा सामना भविष्यात करावा लागणार याचे संकेत मिळत आहेत. पिण्याच्या पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन प्रयत्न करत असली तरी राजकीय वादात प्रयत्न बासनात गुंडाळले जातात. त्यामुळे राजकीय नेते मंडळींनी पिण्याच्या पाण्याचे महत्त्व लक्षात घेत काळाजी गरज असलेल्या प्रकल्पात अडथळा आणणे मतदारराजाची नाराजी ओढावून घेणे आहे.

मतदार टिकला तर खुर्ची टिकेल, याचा विचार करत मुंबईकरांच्या हिताचे प्रकल्प मार्गी लागावेत, यासाठी राजकारण करावे; अन्यथा पाण्यासाठी काय; पण याला नेते मंडळी जबाबदारी असतील, हेही तितकेच खरे.

सांडपाण्यावर प्रक्रिया उपयोगी

पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता मुंबई महापालिकेने सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य उपलब्ध व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मनोरी येथे समुद्राचे पाणी गोडे करण्यासाठी हालचाल सुरू केली. जुलै अखेरपर्यंत जागतिक पातळीवर निविदा मागवण्याचा निर्णय झाला; मात्र राज्यात सत्तांतर झाले आणि मनोरी येथील पाणी गोडे करण्याचा प्रकल्प अडकला. आडव्या उभ्या मुंबईचा विकास झपाट्याने होत असताना मूलभूत गरजांकडे आपणच दुर्लक्ष करत आहोत. पाणी हा प्रत्येक व्यक्तीचा अधिकार अशी ओरड होते; परंतु ‘पाणी वाचवा, पाणी साठवा’ अशी ओरड कोणीही करताना दिसत नाही. मला मिळालं म्हणजे विषय संपला असा गोडगैरसमज आता वाढू लागला आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा, पाणीच येत नाही, गढूळ पाणीपुरवठा अशा विविध कारणांमुळे मुंबईत पाण्याची ओरड सुरूच असते. भविष्यात वातावरणातील जलदगतीने होणारे वातावरणीय बदलामुळे वेळेत पावसाचे आगमन होत नाही. भविष्यात अनेक बदल घडतील; पण पिण्याचे पाणी हे आपले जीवन आहे. पाणी नाही तर जीवन नाही, ही भीती मनाशी बाळगत पुढील उपाययोजना करण्यासाठी पाऊल उचलले तर अन् तरच आपले अस्तित्व टिकेल.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in