मुंबईत पाणीकपात; ३० मेपासून ५ टक्के, तर ५ जूनपासून १० टक्के

वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याने तळ गाठला.
मुंबईत पाणीकपात; ३० मेपासून ५ टक्के, तर ५ जूनपासून १० टक्के

गिरीश चित्रे/मुंबई : वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन होत असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाण्याने तळ गाठला. शनिवार, २५ मे रोजी सातही धरणांत फक्त ९.६९ टक्के म्हणजेच १ लाख ४० हजार २०२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे पुढील नियोजन डोळ्यासमोर ठेवून मुंबई, ठाणे व भिवंडीत ५ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. दरम्यान, धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस बरसत नाही, तोपर्यंत पाणी कपात लागू असेल, पालिकेच्या जल विभागाचे प्रमुख अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईत पाणी कपात लागू झाल्याची माहिती मुंबई, ठाणे व भिवंडीकरांना मिळावी यासाठी गुरुवार, ३० मे पासून पुढील सहा दिवस ५ टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. त्यानंतर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू असेल, असेही ते म्हणाले.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. २५ मे रोजी सातही धरणांत १ लाख ४० हजार २०२ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असून राज्य सरकारने २ लाख २८ हजार १४० दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा उपलब्ध केला आहे. पालिका व राज्य सरकारने उपलब्ध केलेला राखीव पाणीसाठा एकूण ३ लाख ६८ हजार ३४२ दशलक्ष लिटर उपलब्ध असून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पुरेल इतका आहे. सन २०२१-२२ या दोन वर्षांत १५ ऑक्टोबरपर्यंत मान्सून सक्रिय होता. मात्र सन २०२३ मध्ये ऑक्टोबर महिन्यात तुलनेने पाऊस झाला नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा धरण साठ्यात सुमारे ५.६४ टक्के पाणीसाठा कमी आहे. सातही धरणांतील पाणीसाठ्यावर पालिका अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून आहे. दररोज नियोजनपूर्वक पाणीपुरवठा केला जात आहे.

ठाणे, भिवंडीतही १० टक्के पाणी कपात!

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यापैकी १५० दशलक्ष लिटर पाणी ठाणे व भिवंडी महापालिकेला पुरवठा करण्यात येतो. मात्र सातही धरणांतील पाण्याची पातळी खालावल्याने मुंबईत ५ जूनपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. ठाणे व भिवंडी महापालिकेलाही ५ जूनपासून १० टक्के पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.

पेल्यातच पाणी द्या!

उपाहारगृहे, हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी. जेणेकरून अकारण पाण्याने भरून ठेवलेल्या पेल्यातील पाणी वाया जाणार नाही.

टाक्या ओव्हर फ्लो होणार नाहीत याची काळजी घ्या!

सर्व घरांमध्ये, गृहनिर्माण संस्थांमध्ये पाण्याची यंत्रणा, वाहिन्या तपासाव्यात. कोठेही गळती आढल्यास तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी, यातून पाण्याची बचत देखील होते व पाणी दूषित होत नाही. छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओसंडून वाहणार (ओव्हरफ्लो) नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.

२५ मे रोजी धरणातील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

मोडक सागर - २२,८७७

तानसा - ४१,४७८

मध्य वैतरणा - २१,९४८

भातसा - ४५,०२४

विहार - ६,४३८

तुळशी - २,४३७

तीन वर्षांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

२०२४ - १,४०,२०२

२०२३ - २,१८,५०९

२०२२ - २,८८,७९८

असा टाळा पाण्याचा अपव्यय!

> आवश्यक तितकेच पाणी पेल्यातून प्यावे. आंघोळीसाठी शॉवरचा उपयोग न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ केल्याने पाण्याची मोठी बचत होते. नळ सुरू ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे.

> घरकामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांत पाणी घेऊन कामे उरकावीत.

> वाहने धुण्यासाठी नळी न लावता भांड्यामध्ये पाणी घेऊन ओल्या कापडाने वाहने पुसणे सहज शक्य असते. घरातील लादी, गॅलरी, व्हरांडा, जिने आदी धुवून काढण्याऐवजी ओल्या फडक्याने पुसून घ्या. आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नका. वॉशिंग मशीनमध्ये एकाचवेळी शक्य तेवढे कपडे धुतल्यास, मशीनचा पर्यायाने पाण्याचा वापर कमी होऊ शकतो.

logo
marathi.freepressjournal.in