शहरातील काही भागात पाणीकपात! तज्ज्ञ समिती गुरुवारी अंतर्गत पाहणी करणार ;मलबार हिल जलाशय पुनर्बांधणी

शहरातील काही भागात पाणीकपात करण्यात येणार असून काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.
शहरातील काही भागात पाणीकपात! तज्ज्ञ समिती गुरुवारी अंतर्गत पाहणी करणार ;मलबार हिल जलाशय पुनर्बांधणी

मुंबई : मलबार हिल जलाशयाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी आयआयटी पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक आणि पालिका अधिकाऱ्यांची तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. सध्याच्या प्रस्तावाचे पुनरावलोकन करून या समितीने योग्य कार्यपद्धती सुचविणे अपेक्षित आहे. त्यामुळे तज्ज्ञ समितीमार्फत गुरुवारी मलबार हिल जलाशयातील कप्पा क्रमांक-२ ची अंतर्गत पाहणी करण्यात येणार आहे. या कारणाने जलाशयाचा कप्पा क्रमांक-२ रिक्त करणे आवश्यक आहे. त्यामुळे शहरातील काही भागात पाणीकपात करण्यात येणार असून काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

७ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सकाळी १० वाजेपर्यंत या २ तासांच्या कालावधीत तज्ज्ञ समिती जलाशयाची अंतर्गत पाहणी करणार आहे. त्यासाठी कप्पा रिक्त केल्याने, मुंबई शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

‘ए’ विभाग

कफ परेड व आंबेडकर नगर – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ सकाळी ११.२० ते दुपारी १.४५ वाजेपर्यंत)- याठिकाणी १०० टक्के पाणीपुरवठा बंद राहिल.

नरिमन पॉईट व जी. डी. सोमाणी – (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ दुपारी १.४५ ते ३ वाजेपर्यंत) - पाणीपुरवठ्यात ५० टक्के पाणीपुरवठ्यात करण्यात येईल.

मिलीट्री झोन- (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ – २४ तास) – पाणीपुरवठ्यात ३० टक्के कपात करण्यात येईल.

मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणी पुरवठा होणारे 'ए' विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) - पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

सी विभाग

मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे 'सी' विभागातील सर्व क्षेत्र – पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

डी विभाग

पेडर रोड- (नियमित पाणीपुरवठ्याची वेळ - दुपारी १ ते रात्री १०.३० वाजेपर्यंत) – पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात येईल.

मलबार हिल व आझाद मैदान जलाशयातून पाणीपुरवठा होणारे 'डी' विभागातील सर्व क्षेत्र (उपरोक्त विभाग वगळून) पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.)

जी उत्तर व जी दक्षिण विभाग

जी उत्तर व जी दक्षिण विभागातील थेट पाणीपुरवठा होणारे सर्व विभाग – पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात येईल.

पाण्‍याचा जपून वापर करावा!

या कालावधीत पाण्‍याचा जपून वापर करावा आणि महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in