मिस्‍ट कॅनॉन यंत्रांद्वारे पाणी फवारणी; धूळ रोखण्यासाठी BMC ची उपाययोजना

वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने प्रमाणित कार्यपद्धतीसह उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने प्रमाणित कार्यपद्धतीसह उपाययोजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला आहे. या अंतर्गत आता प्रमुख आणि छोट्या रस्त्यांवरील स्वच्छता व धूळ प्रतिबंधासाठी यंत्रांचा प्रभावीपणे वापर केला जात आहे. सद्यस्थितीत २४ प्रशासकीय विभागांमध्‍ये ट्रक माऊंट फॉग मिस्‍ट कॅनॉन संयंत्रांद्वारे पाणी फवारणी केली जात आहे. या सोबतच रस्‍ते ब्रशिंग करून, पाण्‍याने धुवून काढण्‍यासाठी १०० टँकर तैनात करण्‍यात आले आहेत. त्‍याद्वारे धूळ प्रतिबंध उपाययोजना केली जात आहे.

महानगरपालिकेच्‍या सर्व विभागांनी एकत्रित येऊन वायू प्रदूषण आणि वातावरणीय बदलाचे परिणाम ओळखून त्यावर एकसंधपणे कार्यवाही सुरू केली आहे. त्‍यात, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग, घनकचरा व्‍यवस्‍थापन विभाग, इमारत प्रस्‍ताव विभाग, रस्‍ते व वाहतूक विभाग आणि प्रशासकीय विभाग कार्यालय यांचा समावेश आहे. महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय विभाग कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्थानिक गरजानुरुप उपाययोजना आखल्‍या आहेत. तर २४ प्रशासकीय विभागांमध्‍ये ट्रक माऊंट फॉग मिस्‍ट कॅनॉन संयंत्रांद्वारे दोन सत्रांमध्‍ये (शिफ्ट) पाणी फवारणी केली जात आहे. ज्‍या ठिकाणी बांधकाम, पाडकाम, खोदकाम सुरू आहे, अशा ठिकाणी प्रकर्षाने पाणी फवारणी केली जात आहे. या सोबतच रस्‍ते ब्रशिंग करून पाण्‍याने धुवून काढण्‍यासाठी १०० टँकर तैनात करण्‍यात आले आहेत.

वायू प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू

मोकळ्या जागेत बांधकामाच्या साहित्यावर नियमितपणे पाणी फवारणी होत असल्‍याची खातरजमा केली जात आहे. विनापरवाना अथवा बेकायदेशीर राडारोडा वाहतूक करणाऱ्या, तसेच वाहनावर आच्छादन न टाकता सुरक्षेची कोणतीही उपाययोजना न करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. तसेच मुंबई हे आंतरराष्ट्रीय महानगर आहे. याठिकाणी सतत पर्यटकांचा राबता असतो. त्यामुळे या महानगराची प्रतिमा जागतिक पातळीवरही स्वच्छ राहावी यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सतत प्रयत्नशील आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी महानगरपालिकेचे निरनिराळे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती पालिका अधिकाऱ्याने दिली.

logo
marathi.freepressjournal.in