
मुंबई : अंधेरी पश्चिम परिसरात पाणीपुरवठा करणारी बाराशे व्यासाची जलवाहिनी बुधवारी सायंकाळी फुटली. अंधेरी पश्चिम परिसरात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने कळताच पालिकेच्या जल विभागाने युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेत आठ तासांत जलवाहिनी दुरुस्ती केली. यामुळे अंधेरी पश्चिम परिसरातील लोखंडवाला संकुल परिसर, मिल्लत नगर, सरदार वल्लभ भाई पटेल नगर आणि म्हाडा या परिसराचा पाणी पुरवठा गुरूवारी सुरळीत झाला.
आदर्श नगर रस्ता, ट्विंकल अपार्टमेंटसमोर १,२०० मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीची लोखंडी झडप (वर्कींग मॅनहोल) बुधवारी, २३ ऑगस्टला दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास निखळल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागले. हे समजताच महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याच्या आणि 'के पश्चिम' विभाग कार्यालयाच्या अधिकारी, कर्मचारी व कामगारांनी घटनास्थळी धाव घेत जलवाहिनी दुरूस्तीचे काम तातडीने हाती घेतले. आठ तास अव्याहतपणे काम करत बुधवारी रात्री अकरा वाजता जलवाहिनी दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण केले. गुरुवारपासून या परिसरातील पाणी पुरवठा पूर्ववत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, जलवाहिनीतून पाणीउपसा केल्यानंतर वर्कींग मॅनहोल नव्याने बसविण्यात आले. यानुसार १५ जणांच्या चमूने सलग आठ तास काम करत जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण केले, असे उपआयुक्त चक्रधर कांडलकर यांनी सांगितले.
जलवाहिनीचे झडप निखळले
भूमिगत जलवाहिनीस गळती झाली, पाणीपुरवठ्यात व्यत्यय आल्यास दुरूस्ती कामे करता यावी, यासाठी जलवाहिनीवर काही ठिकाणी वेल्डींग करून लोखंडी झडप (वर्कींग मॅनहोल) कार्यान्वित ठेवण्यात येते. त्यामुळे अधिकारी - कर्मचा-यांना जलवाहिनीतील बिघाड नेमका कोठे झाला हे समजून दुरूस्ती काम करणे शक्य होते. अंधेरी येथे झालेल्या जलवाहिनीची झडप निखळल्याने ही घटना घडल्याची माहिती जल अभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली.