
मुंबई : नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी बुधवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते गुरुवार, ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत, ३० तासांच्या कालावधीत एस, एल, के पूर्व, एच पूर्व आणि जी उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. यात के पूर्व विभागातील आंतरराष्ट्रीय विमानतळ व सिप्झ - मुलगाव डोंगरी, एमआयडीसी, मार्ग क्रमांक १ ते २३ या प्रमुख विभागांचाही समावेश आहे. ट्रान्स अपार्टमेंट, कोंडीविटा, महेश्वरी नगर, उपाध्याय नगर, ठाकूर चाळ, साळवे नगर, भवानी नगर, दुर्गापाडा, मामा गॅरेज या विभागातही ५ आणि ६ फेब्रुवारी २०२५ रोजी पाणीपुरवठा पूर्णत: बंद राहणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
पवई अँकर ब्लॉक ते मरोशी जलबोगदा (टनेल शाफ्ट) दरम्यान पालिकेमार्फत नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे १८०० मिलीमीटर व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम या दोन जलवाहिन्या अंशतः खंडित करून नवीन २४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ३० तासांच्या कालावधीत एस, एल, के पूर्व , एच पूर्व, आणि जी उत्तर विभागांतील काही परिसरांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळालाही फटका
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा पाणीपुरवठा बुधवारी आणि गुरुवारी पूर्णत: बंद राहणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. विमानतळावरून दिवसाला हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यांच्यासाठी ही खास बाब असणार आहे. मुंबई विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. तर सीएसएमआयएने २०२४ मध्ये ३,४६,७०० हवाई वाहतुकीची नोंद केली आहे. गतवर्षाच्या तुलनेत ही वाढ ३. २ टक्क्यांनी वाढली असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे इतक्या भव्य विमानतळाचा पाणीपुरवठा दोन दिवसांसाठी बंद होणार असल्याने प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोय होऊ नये म्हणून विमानतळ प्रशासनाला पूर्वकल्पना दिल्याचेही पालिका प्रशासनाने सांगितले आहे.