पानी पानी रे...!

तलाव ओव्हरफ्लो तरीही मुंबईत पाणीकपात कायम
 पानी पानी रे...!

मुंबई : मुंबईकरांवरील पाणीसंकट अद्यापही कायम असले तरी गेल्या काही दिवसांपासून वरुणराजा मात्र प्रसन्न झाला आहे. धरणक्षेत्रात वरुणराजाने चांगली बॅटिंग केली असून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी तुळशी तलाव ‘ओव्हरफ्लो’ होऊन वाहू लागला आहे. मात्र असे असतानाही जुलै महिना संपत आला असला तरीही मुंबईकरांवरील १० टक्के पाणीकपात मागे घेण्यात आली नाही. यंदाच्या वर्षी ‘अल निनो’चा प्रभाव असल्यामुळे देशातील पर्जन्यमानावर त्याचा परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच प्रशासनाने ‘सावध ऐका पुढल्या हाका’, या केशवसुतांच्या कवितेप्रमाणे सावध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईत सोमवारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शहरात धुव्वांधार कोसळणाऱ्या वरुणराजाची बुधवारी सकाळपर्यंत मात्र धरणक्षेत्रातील इनिंग काहीशी समाधानकारक नव्हती. बुधवारी सकाळपर्यंत फक्त १८ हजार दशलक्ष लिटर इतक्याच पाणीसाठ्याची भर पडली होती. मुंबई शहराला वर्षभर पाणीपुरवठा करण्यासाठी तलावांमध्ये १४.४७ लाख मिलिलिटर पाणीसाठा असणे आवश्यक असते. गेल्या वर्षी १९ जुलैपर्यंत ८६.६७ टक्के इतका पाणीसाठा उपलब्ध होता. मात्र यंदा जून अखेरपर्यंत पावसाने दडी मारल्यामुळे धरणक्षेत्रातील पाणीसाठा आटला होता. आता गेल्या दोन-तीन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे पाणीसाठ्यात हळूहळू भर पडत आहे. मात्र असे असले तरी मुंबईतील पाणीकपात कमी करण्याचा निर्णय तूर्तास तरी घेण्यात आलेला नाही. आता पुढील दोन आठवड्यात धरणक्षेत्रात किती पाणीसाठ्याची भर पडते, त्यानंतरच १० टक्क्यांची पाणीकपात पाच टक्क्यांवर आणावी की नाही, याचा आढावा घेतला जाणार आहे.

एकीकडे १० टक्के पाणीकपात सुरू असताना मुंबईतील बऱ्याच भागांमध्ये १०पेक्षा जास्त टक्क्यांनी पाणीकपात होत असल्याचा आरोप तेथील नागरिकांकडून केला जात आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणा-या तलावांनी तळ गाठल्याने १ जुलैपासून पालिकेने मुंबईत १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. मात्र अनेक ठिकाणी ५० टक्के छुपी पाणीकपात केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत, असा आरोप पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

मुंबईत पाऊस उशिराने दाखल झाल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात पुरेसा पाणीसाठा राहिला नाही. सध्या पाऊस सुरू असला तरी अजूनही तलावक्षेत्रात अपेक्षित पाणीसाठा जमा झालेला नाही. तलावांत फक्त ३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे उर्वरित ७० टक्के पाणीसाठा जमा होईपर्यंत पाणीकपात मागे घेतली जाणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना तोपर्यंत पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. मात्र अनेक ठिकाणी ५० टक्के छुपी पाणीकपात केली जात आहे.

सायन कोळीवाड्याला फटका

सायन कोळीवाड्यातील रहिवाशांना छुप्या पाणीकपातीचा मोठा फटका बसला आहे. इतर भागातील नागरिकही पाणीटंचाईने त्रस्त आहेत. १० टक्के पाणीकपात जाहीर केली आहे, पण ५० टक्के छुपी पाणीकपात केली जात असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. काही भागात आधीच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना त्यात पाणीकपातीची भर पडल्याने नागरिक हैराण आहेत, असेही रवी राजा यांनी ट्वीट करून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान, सायन कोळीवाडा, अंधेरी, मालाड, मालवणी, वाशी नाका आदी भागात पाणीटंचाईला नागरिकांना सामोरे जावे लागते आहे. सध्या पाऊस समाधानकारक पडत असतानाही पाणीटंचाईने नागरिक त्रस्त आहेत. प्रशासनाने नागरिकांची ही गैरसोय दूर करावी, असे रवी राजा यांनी म्हटले आहे.

धरणांतील पाणी साठा ( दशलक्ष लिटर)

मोडक सागर - ८१,२१४

मध्य वैतरणा - ९८,०९५

अप्पर वैतरणा - ३३,६०५

भातसा - २,३१,९२०

तानसा - १,०३,०३१

तुळशी - ८,०४६

विहार - १७,४२७

तीन वर्षांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)

२०२३ - ५,७३,३४०

२०२२ - १२,८,०६८

२०२१ - ४,८०,७८३

तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाल्याचा दिवस

२० जुलै २०२३ रोजी मध्यरात्री १.२५ वाजता

१६ जुलै २०२२ रोजी ५.४५ वाजता

१६ जुलै २०२१ रोजी सकाळी ११ वाजता

२७ जुलै २०२० रोजी दुपारी १२ वाजता

१२ जुलै २०१९ रोजी भरून वाहू लागला

९ जुलै २०१८ रोजी भरून वाहू लागला

१४ ऑगस्ट २०१७ रोजी भरून वाहू लागला

१९ जुलै २०१६ रोजी भरून वाहू लागला

तुळशी तलावाविषयी थोडेसे...

तुळशी तलावाचे बांधकाम १८७९ चे असून मुंबई महापालिका मुख्यालयापासून साधारणपणे ३५ किलोमीटर (सुमारे २२ मैल) अंतरावर हा तलाव आहे. या तलावाचे बांधकाम सन १८७९ मध्ये पूर्ण झाले. तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.७६ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे १.३५ चौरस किलोमीटर एवढे असते. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते.

logo
marathi.freepressjournal.in