मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; तलाव १०० टक्के भरले

विहार व तुळशी या दोन तलावांतून अशा एकूण सात तलावांमधून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो.
मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली; तलाव १०० टक्के भरले

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. सद्य:स्थितीत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात ९९.३२ टक्के म्हणजेच १४ लाख ३७ हजार ४६७ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असून ऑक्टोबर २०२३ पर्यंत पुरेल इतका हा साठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा या मुंबई शहराबाहेरील (ठाणे जिल्हा परिसर) पाच तलावांतून आणि मुंबईतील विहार व तुळशी या दोन तलावांतून अशा एकूण सात तलावांमधून मुंबईला दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच, मुंबई महापालिका आपल्या ठाणे, भिवंडी व निजामपूर महापालिका हद्दीत दररोज १५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करते.

मुंबईची वर्षभराची तहान भागविण्यासाठी पावसाळा संपल्यावर म्हणजे दरवर्षीच्या १ ऑक्टोबरच्या सुमारास सात तलावांत १४,४७,३६३ दशलक्ष लिटर इतक्या पाणीसाठ्याची आवश्यकता असते. १३ सप्टेंबर २०२२ रोजी सातही धरणांत १४ लाख ३७ हजार ४६७ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे व त्यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in