पाण्याची चिंता मिटली सात धरणात मे महिन्यापर्यंतचा पाणीसाठा

मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सात धरणात १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे
पाण्याची चिंता मिटली सात धरणात मे महिन्यापर्यंतचा पाणीसाठा

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणात ३ ऑगस्ट रोजी ११ लाख २८ हजार ३४५ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. हा पाणीसाठा २९३ दिवस म्हणजे मे २०२४ पर्यंत मुंबईकरांची तहान भागवेल इतका जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असली तरी सध्या सुरू असलेली १० टक्के पाणीकपात कायम राहणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात पावसाची धरण क्षेत्रातील हजेरी आणि पाणीसाठ्यात होणारी वाढ यावर लक्ष असून समाधानकारक पाण्याच्या पातळीत वाढ झाली तर पाणीकपात रद्द करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. जून महिन्यात वरुणराजाने धरणक्षेत्रात पाठ फिरवल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात ७ टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने १ जुलैपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. तर सात धरणांतून मुंबईला दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सात धरणात १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. जुलैच्या सुरुवातीपासून धरणक्षेत्रात पावसाची दमदार इनिंग सुरू असल्याने ३० जून रोजी ७ टक्के असलेल्या पाणीसाठ्यात वाढ होत ३ ऑगस्ट रोजी ७७.९५ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.

तलाव क्षेत्रात चांगला पाऊस बरसत असल्याने विहार, तुळशी, तानसा, मोडक सागर हे तलाव भरून वाहू लागले असून उर्वरित तीन तलावांत ५० टक्क्यांपेक्षाही जास्त पाणीसाठा जमा आहे.

३ ऑगस्ट रोजी धरणातील पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा १,२९,९१५

मोडकसागर १,२८,९२५

तानसा १,४४,२४०

मध्य वैतरणा १,८५,१४३

भातसा ५,०४,३७९

विहार २७,६९८

तुळशी ८०४६

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in