रसाळ कलिंगडे गारेगार, रखरखीत उन्हात आधार!

उन्हाळ्यात जीव पाणी-पाणी करत असल्याने, नागरिकांची पावलं आता आपोआप कलिंगडाच्या दुकानांकडे वळत आहेत.
रसाळ कलिंगडे गारेगार, रखरखीत उन्हात आधार!

उन्हाळा सुरू होताच एपीएमसीसह सर्वच फळ बाजारात, रस्त्यांच्या कडेला थंडगार, रसाळ फळांच्या हंगामाला सुरुवात होत असते. सध्या बाजारात लाल रंगाचे रसरशीत कलिंगड, टरबूज दाखल झाले असून, ग्राहकांची सर्वाधिक मागणी आहे.

उन्हाळा सुरू झाला असून, नागरिक रसाळ व थंडगार पेयाला पसंती देत असतात. त्यामुळे रस पेयाची मागणीदेखील वाढत आहे. शरीराला थंडावा देणारे कलिंगड बाजारात मुबलक उपलब्ध झाले असून, त्यांना ग्राहक पसंती देत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच आंब्यापाठोपाठ मार्च महिन्यापासून फळबाजारात, रस्त्यांच्या कडेला कलिंगड विक्री जोमात सुरू आहे. उन्हाळ्यात जीव पाणी-पाणी करत असल्याने, नागरिकांची पावलं आता आपोआप कलिंगडाच्या दुकानांकडे वळत आहेत. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात सद्यस्थितीत १८० ते २०० गाड्यांची आवक प्रतिदिन होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.

असे आहेत दर

सध्या बाजारात कलिंगड ३२६० क्विंटल आवक होत असून, प्रति क्विंटल ८००– १३०० रुपये, तर किरकोळमध्ये ५०-७० रुपये प्रतिनग दिले जात आहे.

४.५ लाखांचे गजब कलिंगड

रसरशीत आणि आतून लालचुटूक असलेले कलिंगड बहुतांश जणांना आवडतात. कलिंगड बाहेरून हिरवं किंवा पिवळं आणि आतून लाल असतं हे आपण सर्वजण जाणतोच; पण एका देशात काहीसं वेगळ्या प्रकारचं कलिंगड पाहायला मिळतं. हे कलिंगड खूप महाग असतं. या कलिंगडाला ब्लॅक वॉटरमेलन किंवा डेनसूक वॉटरमेलन असं म्हटलं जातं. जपानमधलं ब्लॅक अर्थात डेनसूक वॉटरमेलन काहीसं वेगळं आहे. जपानी लोक खाण्यासोबतच गिफ्ट म्हणून देण्यासाठी डेनसूक वॉटरमेलन खरेदी करतात. महाग असल्याने हाय प्रोफाइल सेलिब्रिटीजना गिफ्ट म्हणून हे कलिंगड देण्याची प्रथादेखील जपानमध्ये आहे. विशेष म्हणजे जपान डेनसूक वॉटरमेलन अन्य देशांना निर्यातदेखील करतं. २०१९ मध्ये एका ब्लॅक वॉटरमेलनची तब्बल ४.५ लाख रुपयांना विक्री झाली होती.

या ठिकाणाहून होते आवक

महाराष्ट्रसह तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून आवक होते. सोलापूर, सांगली, अक्कलकोट, गुलबर्गा या ठिकाणाहून येणाऱ्या कलिंगडांना सर्वाधिक मागणी सध्या सुरू आहे. यामध्ये बेबी आणि नामधारी या प्रजातीच्या कलिंगडची आवक मोठ्या प्रमाणात सुरू असून, यामध्ये शुगरबेबीला अधिक मागणी असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, उन्हाळ्यात रस पेयाबरोबर फ्रुट सलाडलादेखील अधिक मागणी असते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in