लहरी पाऊस, जल संकटाची चाहूल

मुंबईचा विकास झपाट्याने होत असून, लोकसंख्येत ही झपाट्याने वाढ होत आहे. पुढील १८ वर्षांत म्हणजेच २०४१ मध्ये मुंबईची लोकसंख्या १ कोटी ७२ लाखांच्या घरात असेल.
लहरी पाऊस, जल संकटाची चाहूल
Published on

आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून मुंबईची ओळख. त्यामुळे मुंबईत सोयीसुविधांची कुठलीच कमतरता नाही. राज्य सरकार असो वा मुंबई महापालिका मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचा सतत प्रयत्न असतो. मात्र पिण्याचे पाणी निर्माण करणे हे कोणाच्याही हातात नाही. त्यामुळे मुंबईची तहान भागवण्यासाठी रोज मिळणारे पाणी जपून वापरणे ही तुम्हा-आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, आजची बचत उद्याची गरज आहे, याचा विचार तुम्ही- आम्ही सगळ्यांनी करणे गरजेचे आहे, अन्यथा 'जलबिन मछली' या म्हणीप्रमाणे मुंबईची अवस्था होण्यास वेळ लागणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून 'मुंबईत पाणी कपात करणे गरजेचे' झाले आहे. भविष्यात वरुणराजाने मुंबईला हुलकावणी दिली तर मुंबईत काय स्थिती निर्माण होईल याचा विचार न केलेलाच बरा. जून ते सप्टेंबर हे चार महिने पाऊस बरसण्याचे दिवस; मात्र या चार महिन्यांत जेमतेम ३० दिवसच पाऊस बरसतो. त्यामुळे पावसाची हुलकाणी म्हणजे 'जल संकटाची' चाहूल असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

मुंबईचा विकास झपाट्याने होत असून, लोकसंख्येत ही झपाट्याने वाढ होत आहे. पुढील १८ वर्षांत म्हणजेच २०४१ मध्ये मुंबईची लोकसंख्या १ कोटी ७२ लाखांच्या घरात असेल. वाढत्या वयाच्या तुलनेत पिण्याच्या मागणीत लक्षणीय वाढ होणार हे अपेक्षित आहे. पुढील १८ वर्षांत तब्बल २ हजार ८९१ दशलक्ष लिटर आणखी पाण्याची गरज भासणार आहे. पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता गारगाई, पिंजाळ व दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. या प्रकल्पातून मुंबईला कधीपर्यंत पाणीपुरवठा होईल हे अद्याप तरी स्पष्ट नाही. मोडकसागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. परंतु ३९५० दशलक्ष लिटर पाण्यापैकी २७ टक्के म्हणजेच ९०० दशलक्ष लिटर पाणीचोरी व गळतीमुळे वाया जाते. त्यामुळे मुंबईत प्रत्यक्षात ३ हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणीचोरी व गळती रोखणे याला गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.

वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सोयीसुविधा तोकड्या पडणे स्वाभाविक आहे. सोयीसुविधा सहज उपलब्ध होत असल्याने आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, हा आपला स्वभाव झाला आहे. मुंबईत पाणी सहज उपलब्ध होत असले, तरी भविष्यात पाण्याची वाढती गरज लक्षात घेता पाणी जपून वापरणे ही प्रत्येक मुंबईकराची जबाबदारी आहे. धरण क्षेत्राकडे पावसाची पाठ हा मुंबईकरांसह मुंबई पालिकेसाठी चिंतेचा विषय आहे. ब्रिटिशांनी त्यावेळच्या लोकसंख्येच्या तुलनेत धरणांची बांधणी केली. परंतु गेल्या काही वर्षांत मुंबईच्या लोकसंख्येत झपाट्याने होणारी वाढ लक्षात घेता पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करणे शक्य झालेले नाही. समुद्राचे पाणी गोडे करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया याकडे पालिका प्रशासनाने लक्ष केंद्रित केले असले तरी ते लक्ष सहज गाठणे शक्य नाही. त्यातही सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यासाठी उपलब्ध झाले, तरी ते पाणी पिण्याची मुंबईची मानसिकता आहे का, हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे भविष्यातील जल संकट लक्षात घेता प्रत्येकाने पाणी बचतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे, हेही तितकेच खरे.

वातावरणीय बदलामुळे पाऊस लहरी झाला आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बरसणारा पाऊस आता दरवर्षी हुलकावणी देतो. पावसाचा अचूक अंदाज बांधणे दिवसेंदिवस जिकीरीचे झाले आहे. अनेकदा मुंबईत पावसाची दमदार इनिंग सुरू असते, तर मुंबईची तहान भागवणाऱ्या धरणाकडे पावसाची पाठ असते. त्यामुळे 'पाणी कपात' हाच एक पर्याय मुंबई महापालिकेकडे उपलब्ध असतो. भविष्यात वरुणराजाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्राकडे दोन महिने वक्रदृष्टी केली, तर मात्र मुंबईत पाणीबाणी परिस्थिती निर्माण होणार यात दुमत नाही. त्यामुळे लहरी पाऊस म्हणजे 'जल संकटाची चाहूल' आहे.

लोकसंख्येचा विचार करता पाण्याची गरज वाढणार

वातावरणीय बदलामुळे पावसाचे आगमन लांबणीवर पडते किंवा अपेक्षाच्या तुलनेत कमी बरसतो. त्यामुळे गेल्या काही वर्षांत पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून, भारतासारख्या प्रगतशील देशात महाराष्ट्रासह अनेक राज्यांत दरवर्षी पाणीबाणीची स्थिती उद्भवते. मुंबई महापालिका मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी नियोजन पद्धतीने स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा होतो; मात्र भविष्यात पाण्याची टंचाई निर्माण होणार याचे संकेत गेल्या काही वर्षांपासून मिळत असतानाही मुंबईकर पाणी वाया घालवण्यात धन्यता मानतात. मुंबईला सद्यस्थितीत दररोज ३,९५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. भविष्यात वाढत जाणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता पाण्याची गरज वाढणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा, पाणी आडवा, पाणी जिरवा, यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

logo
marathi.freepressjournal.in