मुंबई : वेबसिरीजच्या एका सहाय्यक दिग्दर्शकाला ब्लॅकमेल करून खंडणीसाठी धमकी दिल्याचा प्रकार मालवणी परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी चार अज्ञात व्यक्तीविरुद्ध भादवीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. ४५ वर्षांचे तक्रारदार वेबसिरीजमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करतात. त्यांनी मोबाईलवर टिंडर नावाचे एक ॲॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांची जान्हवी शर्मा ऊर्फ पुचकी या महिलेशी ओळख झाली होती. चॅटदरम्यान तिने त्यांना सर्व कपडे काढण्यास सांगितले होते. दुसऱ्या दिवशी त्यांना एका अज्ञात मोबाईलवरून जान्हवीसोबतचे अश्लील व्हिडीओ आले होते. पैसे ट्रान्स्फर केले नाहीतर हे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती. सुरुवातीला ३५ हजार रुपये पाठवल्यानंतर अखेर त्यांनी मालवणी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.