पर्यावरण रक्षणाचे मार्ग

फेकून दिला जाणारा कचरा कमीत कमी असल्याचे उद्दिष्ट असल्यास कचरा डेपोवरील भार कमी होईल
पर्यावरण रक्षणाचे मार्ग

आपण उपभोगवादी समाजात राहत असल्याने पर्यावरणास अपायकारक कचऱ्याची निर्मिती होते, एवढ्या कचऱ्याचं काय करायचं ही एक मोठी समस्या आहे, दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. अनेक जण यावर वेगवेगळे उपाय सुचवतात, यातील ३ R म्हणजे किमान वापर, (Reduce) पुनर्वापर, (Reuse) पुनर्निर्मिती (Recycle) हे तिन्ही मार्ग फेकला जाणारा आणि पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या कचऱ्याची निर्मिती कमी करण्यासाठी उपयोगी आहेत.

यामुळे कचरा डेपोसाठी कमी जागा लागेल, नैसर्गिक साधनसामग्रीचा योग्य वापर होईल आणि ऊर्जेची बचत होईल. यामुळे पैसे वाचतीलच; पण कचरा विल्हेवाट लावण्यासाठी कमी जागा लागेल. नवीन कचरा डेपो उभारताना अनेक अडचणी येतात, स्थानिकांचा विरोध आणि पर्यावरण नियम यामुळे खर्चात सातत्याने वाढ होते.

किमान वापर या उपायाने कचऱ्याची निर्मितीच होणार नाही, पुनर्वापर या उपायाने कमीतकमी गोष्टी कचऱ्यात फेकल्या जातील. यामुळे पर्यावरण प्रदूषणमुक्त राहीलच, त्याचबरोबर आपला आर्थिक भार किंचित कमी होईल. पुनर्निर्मिती पूर्णपणे वेगळीच प्रक्रिया असून यातून वेगळ्या वस्तूची निर्मिती करून तयार वस्तू नवीन वस्तू म्हणून विकण्यास येते. पुनर्निर्मिती आपल्या कामाच्या ठिकाणी आणि घरी दोन्हीकडे उपयोगी पडेल. फेकून दिला जाणारा कचरा कमीत कमी असल्याचे उद्दिष्ट असल्यास कचरा डेपोवरील भार कमी होईल. यासाठी आपण खालील गोष्टी जाणीवपूर्वक करू यात.

 वापरा आणि फेका या सदरात मोडणाऱ्या वस्तू टाळाव्यात उदा. पेपर कप, डिश, प्लास्टिक वस्तू या वस्तू सहसा न स्वच्छ करता फेकल्या जातात, पैशाच्या आशेने त्या अनेक जण गोळा करतात, असे करत असताना त्यांना जंतुसंसर्ग होतो, याशिवाय यापासून निर्माण झालेल्या वस्तू टिकाऊ नसल्याने अधिक कचऱ्याची निर्मिती होते.

 पुनर्निर्मितीचे बोधचिन्ह असलेल्या वस्तूच खरेदी करा. या चिन्हांचा अर्थ या वस्तूपासून पुनर्निर्मिती करता येईल किंवा पुनर्निर्माण करून ही वस्तू बनवली आहे. घरगुती फर्निचर बनवताना जुन्या लाकडाचा वापर करा.

 किराणा माल खरेदीसाठी कापडी पिशवी घेऊन जा. प्लास्टिक बॅग आवश्यकता असेल तेव्हाच घ्या आणि ती पुन्हा पुन्हा वापरा.

 वस्तू ठेवण्यासाठी, झाकण्यासाठी प्लास्टिक पेपर ऐवजी पुन्हा वापरता येणारे डबे वापरता येतील.

 काही संस्था जुने कपडे, फर्निचर, खेळणी यांची भेट स्वीकारतात त्यांना द्याव्यात, अथवा त्यांची विक्री करावी.

 चहापानासाठी पेपर कप आणि बाटलीबंद पाणी यांचा वापर करण्याऐवजी एक कॉफी मग आणि पाण्याची बाटली स्वतःकडे ठेवावी.

 जुन्या पेपरपासून बनवण्यात आलेल्या कागदांचा वापर करण्याची सवय लावा हे कागद स्वस्त आणि दर्जेदार असतात.

 वस्तू जरुरीप्रमाणे नेहमी मोठ्या प्रमाणात मागवाव्या म्हणजे त्या स्वस्त पडतात त्यासाठी लागणाऱ्या पॅकिंगची बचत होते.

 जेथे किंवा ज्या वस्तूचे जरुरीपेक्षा जास्त पॅकिंग करण्यात येते यासाठीची किंमत आपल्यालाच मोजावी लागत असल्याने अशा वस्तू मागावणे टाळावे.

 पुनर्निर्मिती केलेल्या वस्तू वापरण्यास प्रोत्साहन द्यावे. वापरात असलेल्या वस्तू पुन्हा पुन्हा वापरता येतील किंवा अन्य कारणासाठी वापर करता येईल का? ते पाहावे.

 बिघडलेल्या वस्तू दुरुस्त करून पुन्हा वापरता येतील का? किंवा अन्य कारणासाठी त्याचा वापर करता येईल का? ते पाहावे.

 कागदी रुमालाऐवजी कापडी रुमालांचा वापर करावा, ज्या वस्तू सुट्या आणून रिफिल करून ठेवता येतात, उदा. साफसफाईच्या गोष्टी, बॉडी स्प्रे, केचप इ.

 जेवणाच्या टेबलवरही धुऊन पुन्हा वापरता येतील अशा नॅपकिन्सचा वापर करावा.

 लहान मुलांसाठी धुऊन पुन्हा वापरता येणारे डायपर मिळतात. एकदा वापरून फेकून द्यायच्या डायपरपेक्षा ते स्वस्त आणि पर्यावरणपूरक आहेत.

 अधिकाधिक गोष्टी कागदाचा कमीत कमी वापर करून कशा करता येतील ते पाहावे.

 पेपर टॉवेलच्या ऐवजी डिशक्लोथचा वापर करावा. ज्यामुळे पेपरची नासाडी थांबेल.

 वेगवेगळ्या विषयांच्या वेगळ्या वैयक्तिक फाईल बनवण्याऐवजी एक सामायिक केंद्रीय फाईल बनवावी.

 कामाच्या ठिकाणी वापरायचे कागद पाठपोठ वापरावेत. कच्च्या कामासाठी निरुपयोगी पाठ कोऱ्या कागदांचा वापर करावा.

 तकलादू वस्तूऐवजी टिकाऊ वस्तूचा वापर करावा.

 ड्रायक्लीन करावे लागणार नाहीत, असे कपडे वापरल्याने विषारी रसायनाचा वापर कमी होईल.

 वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूची विल्हेवाट लावण्याची सोय करण्यासाठी स्थानिक स्वराज संस्थेकडे मागणी करावी. वापरता येणाऱ्या वस्तू ज्यांना उपयोग असेल त्यांना वापरायला द्याव्या किंवा त्यांची विक्री करावी.

 शीतपेयांच्या रिकाम्या बाटल्यांचे, वर्तमानपत्राच्या रद्दी कागदाचे कल्पक उपयोग करावेत, अथवा अशा वस्तू जमा करणाऱ्यांकडे द्याव्यात.

 कामाच्या ठिकाणी लागणाऱ्या वस्तू या किमान आवश्यक पॅकिंग असलेल्या घ्याव्या, जेथे शक्य असेल तेथे पुन:प्रक्रिया केलेल्या वस्तूंचा वापर करावा. वापरून राहिलेल्या वस्तूचा कसा वापर करता येईल ते पाहावे.

 खरकटे, निवडून राहिलेला भाजीपाल्याचा भाग, पालापाचोळा यापासून बायोगॅस, खत बनवता येईल. गांडूळ खताची निर्मिती करता येईल.

 परदेशात चांगल्या दर्जाच्या वापरलेल्या वस्तू कपडे यांची दुकाने आहेत हा एक चांगला पर्याय आहे.

 भेटवस्तू देताना त्या गुंडाळण्यासाठी कागदाऐवजी कापडी पिशव्या वापराव्यात. आलेल्या भेटीवरील कागद फाडण्याऐवजी व्यवस्थित काळजीपूर्वक काढावा.

 कम्प्युटर, लॅपटॉप बदलण्याऐवजी अपडेट करावेत.

ही यादी खूप मोठी होऊ शकते. अनेक उद्योजक पर्यावरण रक्षणाचे नियम धाब्यावर बसवतात, असे आपण वाचतो. त्याच बरोबर असे अनेक उद्योजक आहेत, जे त्याच्या मूळ उद्योगातून निर्माण झालेल्या किंवा शिल्लक राहिलेल्या मालाचा अधिक चांगला उपयोग कसा करता येईल याचा प्रयत्न करत असतात. यामुळे उत्पादननिर्मिती खर्चात बचत होते. घरातील गृहिणीही शिल्लक खाद्यपदार्थातून नवा पदार्थ तयार करत असतात. तेव्हा पर्यावरण रक्षणाचा विचार सतत मनात ठेवून आपल्याला जे जे शक्य आहे ते करू या.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in