शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे ;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे ;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

वातावरणात होत असलेल्या बदलांमुळे विविध आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे निसर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. वसुंधरेची जपणूक करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी पार पाडूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केले.

वातावरणीय बदलाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने विविध उपायोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून समृद्ध पर्यावरण निर्माण करण्यासाठी ‘माझी वसुंधरा अभियान २.०’ हे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविण्यात येत आहे. याअंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक संस्था, विभागीय व जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांचा सन्मान जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब जऱ्हाड, सदस्य सचिव अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘‘पर्यावरणात प्रत्येक घटक महत्वाचा आहे. आपण सर्वजण एक‍ टीम आहोत आणि सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर कोणताही उपक्रम कसा यशस्वी होऊ शकतो, याचे ‘माझी वसुंधरा अभियान’ हे उत्तम उदाहरण आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यात सहभागी झाले याचा आनंद आहे. विकास करताना तो पर्यावरणाची जपणूक करून शाश्वततेकडे जाणारा असला पाहिजे. मागील काही वर्षांत कमी दिवसांत अधिक पाऊस पडतोय, दरडी कोसळत आहेत यामुळे होणाऱ्या हानीपासून पुढील पिढीचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राज्य शासनाने प्रत्यक्ष पावले उचलली आहेत. त्यानुसार वसुंधरेची जपणूक करण्याचा आपला जुना संस्कार नव्याने रूजविण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

निसर्गाची हाक ऐकण्याची वेळ आली आहे, माझी वसुंधरा अभियान हे असेच आपल्याला निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारे अभियान असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या अभियानांतर्गत उत्कृष्ट काम केलेल्या सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले. अजित पवार यांनी पर्यावरण जपणे महत्वाचे असल्याचे स्पष्ट केले. कोणत्याही उपक्रमात लोकसहभाग अंतर्भूत असला की त्यात यश नक्कीच मिळते. पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी यापुढे २०० कोटी रूपयांचा निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले. स्वच्छता ही संस्कृती बनावी, असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.

‘इज ऑफ लिव्हिंग’साठी काम करायचे आहे, असे सांगतानाच आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करतानाच शाश्वत विकास साधून नागरिकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी काम करायचे असल्याचे सांगितले. नुकत्याच डावोस येथे झालेल्या परिषदेत गुंतवणुकीबरोबरच शाश्वततेवर भर दिला जात होता, हा जागतिक पातळीवर होत असलेला मोठा बदल असून राज्याच्या इलेक्ट्रीक वाहन धोरणाबाबत कौतुकाने बोलले जात असल्याचा अनुभव प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती देऊन यामुळे देशाला प्रगतीची मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात नवी दिशा दाखवणारे काम होईल, असा विश्वास आदित्य ठाकरे त्यांनी व्यक्त केला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in