
“अडीच वर्षांपूर्वीच जे व्हायला हवे होते ते शिवसेना आणि भाजप सरकार आम्ही आता स्थापन केले. हे सरकार जनतेच्या मनातील सरकार आहे,” असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत केला. शिवसेनेच्या १२ खासदारांनी लोकसभेत स्वतंत्र गट केल्याचे पत्र लोकसभा सभापतींना दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन, “आम्ही आजही शिवसेनेत असल्याचे व जे आमच्यासोबत येतील त्यांना घेऊन पुढे जाऊ,” असे जाहीर केले.
“तूर्तास आम्ही फक्त गटनेता बदलला असून, पक्षाच्या प्रतोदपदी खासदार भावना गवळी कायम आहेत. त्या शिवसेनेच्या सर्व खासदारांना व्हीप बजावतील. राहुल शेवाळे हे लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते म्हणून नियुक्त करण्यात आले असून, १२ खासदारांचे पत्र सभापतींना दिले आहे,” अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. उद्धव ठाकरेंसोबत पॅचअप करणार का, असा प्रश्न शिंदे यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर, “आम्ही आजही शिवसेनेत आहोत. बाळासाहेब ठाकरेंचा हिंदुत्वाचा विचार आम्ही पुढे नेत आहोत. आमच्यासोबत जे येतील, त्यांना घेऊन आम्ही पुढे जाऊ,” असे गोलमाल उत्तर शिंदे यांनी दिले. “एकनाथ शिंदे पक्षप्रमुख झाले आहेत का? नाही ना. मी, विधिमंडळ पक्षाचा गटनेता आहे. मुख्यमंत्री आहे. बाळासाहेबांचे स्वप्न आम्ही पूर्ण करत आहोत. त्यांची भूमिका आम्ही सोडलेली नाही,” असे शिंदे म्हणाले.