
भारतीय स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबई महापालिका प्रशासनाकडून मोफत राष्ट्रधव्ज वाटप केले जात आहेत. मात्र हे राष्ट्रध्वज निकृष्ट असून छपाई चुकीच्या पद्धतीने केली असून रुंदी व लांबीही चुकीची आहे. असे राष्ट्रध्वज लावल्याने ध्वजसंहितेचा अवमान होणार आहे. आम्हाला राष्ट्रध्वजाचा आदर आणि अभिमान आहे. यामुळे असे निकृष्ट आणि सदोष राष्ट्रध्वज आम्ही धरावा लावू शकत नाही, असे मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे. दरम्यान निकृष्ट आणि सदोष राष्ट्रध्वज पुरवठा करणाऱ्या पुरवठादारावर कारवाईची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
‘हर घर तिरंगा’ अभियान मुंबईमध्ये राबवले जात असून त्यासाठी ३५ लाख घर, दुकाने, सरकारी खासगी कार्यालये आदी ठिकाणी ५० लाख राष्ट्रध्वज लावले जाणार आहेत. त्यासाठी मुंबई महापालिकेकडून घरोघरी ध्वजांचे वाटप केले जात आहे. वाटप करण्यात येणारे राष्ट्रध्वज हे ध्वज संहितेचे उल्लन्घन करणारे आहेत. याच्या तक्रारी आल्यावर माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिवसेना विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ, अॅडव्होकेट भावीन सावला यांच्या उपस्थितीत पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.