गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर ‌दोन दिवसांत तोडगा काढू

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आश्वासन
गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर ‌दोन दिवसांत तोडगा काढू

मुंबई : गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर येत्या दोन दिवसांत कृती समितीच्या नेत्यांसोबत चर्चा करून तोडगा काढण्यात येईल, असे‌ आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे, अशी माहिती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन आहिर यांनी मंगळवारी आझाद मैदानावरील गिरणी कामगारांच्या आक्रोश मोर्चासमोर बोलताना दिली.

गिरणी कामगार कृती संघटनेच्या वतीने फॉर्म भरलेल्या सर्व कामगारांना घरे मिळालीच पाहिजेत, या मागणीसाठी मंगळवारी विधानभवनवर कामगारांचा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सचिनभाऊ अहिर कामगारांपुढे बोलत होते. या प्रसंगी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी, आमदार सुनिल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार सचिन अहिर म्हणाले, “मुंबईतील सुमारे ३० हजारांवर घरे फक्त बांधकामाचा खर्च पकडून गिरणी कामगारांना आम्ही मिळवून दिली आहेत. मुंबईतील एन‌टीसी गिरण्यांची जागा गिरणी कामगारांना देण्याचा राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा, असा प्रयत्न आपण करणार आहोत. गिरणी कामगार घरांचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शासनाने नेमलेल्या संनियंत्रण समितीत कामगार नेते आणि विरोधी पक्षनेत्यांना डावलून जे पक्षीय राजकारण खेळले गेले आहे, त्याचा आपल्या भाषणात सचिन अहिर यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना घरांच्या प्रश्नावर एक निवेदन देण्यात आले. त्यावेळी सचिन अहिर यांच्यासमवेत कृती समितीचे नेते निवृत्ती देसाई, शिवाजी काळे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in