पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा इशारा

मुंबईत सोमवारपासून बरसणाऱ्या पावसाचा जोर आजही कायम असून गुरुवारी सकाळी पाऊस जोरदार बरसला.

बुधवार रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाने गुरुवारी सकाळपासून मुंबईला झोडपून काढले. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक सखल भागात पाणीच पाणी जमा झाले आणि रस्ते पाण्याखाली गेले होते. रस्त्यांवर गुडघाभर पाणी जमा झाल्याने रस्ते वाहतुकीला फटका बसला तर बेस्ट बसेसचे मार्ग वळवण्यात आले होते. दरम्यान, पुढील चार दिवस मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात मुसळधार अतिमुसळधार पावसाचा इशारा कुलाबा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस वरुणराजाचा मुक्काम असणार आहे. तसेच पुढील चार दिवस मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पावसाचा इशारा कुलाबा हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, कोकण किनारपट्टी या भागात मुसळधार पाऊस होत आहे. मुंबईत सोमवारपासून बरसणाऱ्या पावसाचा जोर आजही कायम असून गुरुवारी सकाळी पाऊस जोरदार बरसला. सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. तर मध्य व हार्बर मार्गावरील लोकल सेवा धीम्या गतीने सुरू होती. हार्बर मार्गावरील मस्जिद बंदर स्थानकातील रुळांवर भिंत कोसळल्याने प्रवाशांचे हाल झाले. मुंबईकर नोकरदारांना उशीरा कामावर पोहचताना गैरसोयीला सामोरे जावे लागले. बेस्ट वाहतूकही वळवण्यात आल्याने कामावर पोहोचायला उशीर झाला. हार्बर लाईनवरील प्रवाशांना मेनलाईनवर प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. त्यात या मार्गावरही लोकल उशीराने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना मोठया गर्दीतून प्रवास करावा लागला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in