पश्चिम रेल्वे प्रशासनाने सहा महिन्यांत बांधले १३३ पादचारी पूल

रेल्वे रूळ ओलांडू नका, असे आवाहन वारंवार रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते
पश्चिम रेल्वे प्रशासनाने सहा महिन्यांत बांधले १३३ पादचारी पूल

रेल्वे रूळ ओलांडत प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मागील काही वर्षांत वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका असताना यामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याच्या घटनाही घडतात. यासोबत रेल्वे रुळांवरील वाढणारी अतिक्रमणे या सर्व बाबी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाने चालू वर्षात मागील सहा महिन्यांत एकूण १३३ पादचारी पूल, आठ स्कायवॉक उभारले आहेत.

रेल्वे रूळ ओलांडू नका, असे आवाहन वारंवार रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येते; मात्र तरीही उपनगरीय रेल्वे मार्गांवरील बहुतांश रेल्वे स्थानकात रूळ ओलांडून प्रवासी ये-जा करतात. प्रशासनाने याबाबत अनेक वेळेस कारवाईचा बडगा उगारला; परंतु पादचारी पुलांची संख्या कमी असल्याने गर्दी टाळण्यासाठी आम्ही रेल्वे रूळ ओलांडत प्रवास करत असल्याचे उद्धट उत्तर काही प्रवाशांकडून देण्यात येत होते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने पश्चिम रेल्वे मार्गांवर चर्चगेट आणि डहाणू रोड दरम्यान एकूण १३३ पादचारी पूल आणि आठ स्कायवॉक उभारले आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांच्या सुविधेत भर पडली आहे.

दरम्यान, एमआरव्हीसीकडून मध्य व पश्चिम रेल्वेचे असे एकूण ८६ पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. सद्य:स्थितीत त्यापैकी मागील पाच वर्षांत ६९ पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, तर अद्याप उर्वरित १७ पुलांचे काम सुरू आहे. यामध्ये कोपर, वांगणी, नेरळ, विठ्ठलवाडी, बदलापूर, वाशी, सानपाडा, घाटकोपर, दादर, उल्हासनगर, गोवंडी आदी स्थानकांवरील पादचारी पुलांचा समावेश आहे. यापैकी काही पादचारी पुलांची शेवटची मुदत यावर्षी ऑक्टोबरपर्यंत तर काही पुलांची शेवटची मुदत पुढील वर्षापर्यंत म्हणजेच २०२३पर्यंत असल्याची माहिती एमआरव्हीसीकडून देण्यात आली आहे. अंधेरी येथील नवीन स्कायवॉक सहा मीटर रुंद आणि ९८ मीटर लांब आहे. सोमवार, १ ऑगस्टपासून हा स्कायवॉक प्रवाशांच्या सेवेत आला आहे. तो स्थानकातील नवीन दक्षिण पादचारी पुलाला जोडतो. हा स्कायवॉक पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्यासाठी जुन्या दक्षिण पादचारी पुलावरील गर्दी कमी करण्यात मदत करेल आणि त्याउलट अतिरिक्त चालण्याचा मार्ग उपलब्ध करून देईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in