मुंबई : थंडा थंडा कूल कूल प्रवास, तोही विना तिकीट चांगलाच महागात पडला. वातानुकूलित लोकलने विना तिकीट प्रवास करणाऱ्या ६० हजार प्रवाशांविरोधात दंडात्मक कारवाई करत तब्बल दोन कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
विना तिकीट अंतरापेक्षा अधिकचा प्रवास, सामान बूक न करता घेऊन जाणे अशा प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर, हाॅलिडे स्पेशलने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणीच्या विशेष टीमने एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ दरम्यान केलेल्या दंडात्मक कारवाईतून तब्बल १७३.८९ कोटींचा दंड वसूल करण्यात आला.
दरम्यान, मार्च २०२४ मध्ये सामान बूक न करता प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २.७५ लाखांचा दंड वसूल केला. तर विनातिकीट अंतरापेक्षा अधिकचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात केलेल्या कारवाईतून १६.७७ कोटींचा दंड वसूल करण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले.