पश्चिम रेल्वेवर १६३ लोकल फेऱ्या रद्द; कांदिवली-बोरिवली दरम्यान आजपासून ३५ तासांचा ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान गर्डरच्या कामासाठी शनिवारी दुपारपासून रविवारी रात्रीपर्यंत ३५ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
पश्चिम रेल्वेवर १६३ लोकल फेऱ्या रद्द; कांदिवली-बोरिवली दरम्यान आजपासून ३५ तासांचा ब्लॉक
Published on

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान गर्डरच्या कामासाठी शनिवारी दुपारपासून रविवारी रात्रीपर्यंत ३५ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे लोकल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. दोन दिवसांत तब्बल १६३ हून अधिक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

कांदिवली आणि बोरिवली स्थानकांदरम्यान गर्डरच्या कामासाठी शनिवार २६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजल्यापासून रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत ३५ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत शनिवारी ७३ आणि रविवारी ९० लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. कांदिवली व बोरीवली स्थानकांदरम्यान असलेल्या पुलाच्या रिगर्डरिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी पाचवी मार्गिका, कारशेड लाइन आणि कांदिवली ट्राफिक यार्ड लाइनवर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.

मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल

ब्लॉक काळात लोकलप्रमाणे मेल-एक्स्प्रेसच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पाचव्या मार्गावरून चालवण्यात येणाऱ्या लोकल आणि मेल-एक्स्प्रेस ट्रेनची वाहतूक जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. काही एक्स्प्रेस वसई, भाईंदरपर्यंत चालविण्यात येणार असल्याने लांब पल्ल्याच्या प्रवाशांचेही हाल होणार आहेत.

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक

मध्य रेल्वेवर हार्बर मार्गावर सीएसएमटी मुंबई आणि चुनाभट्टी / वांद्रे स्थानकांदरम्यान, तर मुख्य मार्गावर विद्याविहार आणि ठाणे दरम्यान - ५व्या ते ६व्या मार्गावर ब्लॉक असेल.

विद्याविहार आणि ठाणे दरम्यान ५व्या आणि ६व्या लाईनवर सकाळी ८ ते दुपारी १२.३० पर्यंत ब्लॉक असेल. मेल एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार स्टेशनवर डाऊन फास्ट लाईनवर वळवल्या जातील आणि ठाणे स्टेशनवर पाचव्या लाइनवर पुन्हा वळवल्या जातील. तर अनेक मेल / एक्स्प्रेस गाड्या ठाणे स्थानकावर अप फास्ट मार्गावर वळवल्या जातील आणि विद्याविहार स्थानकावर सहाव्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील.

या वेळेत सेवा राहणार बंद

हार्बर मार्गावर सीएसएमटी मुंबई आणि चुनाभट्टी / वांद्रे स्थानकांदरम्यान अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० पर्यंत ब्लॉक असेल. सीएसएमटी मुंबईहून वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ पर्यंत आणि सीएसएमटी मुंबईहून वांद्रे/गोरेगावला जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ पर्यंत बंद राहतील.

logo
marathi.freepressjournal.in