मुंबई : पश्चिम रेल्वेने आपल्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन झिरो स्क्रॅप’ या उपक्रमांतर्गत २०२५-२६ या चालू आर्थिक वर्षात (ऑक्टोबर २०२५ पर्यंत) भंगार विक्रीत ३०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. या उपक्रमाचा उद्देश संसाधनांचा कार्यक्षम वापर, पर्यावरणीय शाश्वतता आणि संचालन कार्यक्षमतेत वाढ घडवून आणणे हा आहे.
पश्चिम रेल्वेच्या या यशामुळे पश्चिम रेल्वेने स्क्रॅप विक्रीतील ३०० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण मध्य रेल्वेनंतर या यादीतील आणखी एक प्रमुख विभाग बनला आहे.
कार्यक्षम सामग्री व्यवस्थापन आणि संसाधनांच्या योग्य वापरात पश्चिम रेल्वेने आपली अग्रणी भूमिका अधिक मजबूत केली आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले, ‘या मोहिमेचे यश हे सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे. पश्चिम रेल्वेच्या विविध विभागांनी आणि डेपोने निश्चित उद्दिष्टे पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.’
अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, ‘झिरो स्क्रॅप’ मोहिमेच्या यशाचे दर्शन विक्रीस गेलेल्या विविध साहित्यांमधून होते. ज्यात रेल्वे रूळ, कायमस्वरूपी मार्गसामग्री, जुनी इंजिने, डबे, चाके आणि वॅगन्स यांचा समावेश आहे.
या वर्षीची भंगार विक्री अधिक
पश्चिम रेल्वेच्या माहितीनुसार, रेल्वे बोर्डाने ठरवलेल्या प्रमाणानुसार या वर्षीची भंगार विक्री २१ टक्क्यांनी अधिक आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी १३ नोव्हेंबर २०२४ रोजी ३०० कोटी रुपयांचा आकडा पार करण्यात आला होता, तर यंदा हा टप्पा दोन आठवडे आधीच गाठला आहे.