
दिवाळी आणि छठ सणाच्या पार्श्वभूमीवर अतिगर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने चार प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री तात्पुरती बंद केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. १५ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत तिकीट विक्रीवर निर्बंध लागू राहणार असून, मुंबईतील वांद्रे टर्मिनस तसेच गुजरातमधील वलसाड, उधना आणि सूरत स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद राहील, असे पश्चिम रेल्वेच्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.
...म्हणून घ्यावा लागला निर्णय
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातील सणासुदीच्या काळात मुंबईतील वांद्रे स्थानकावर ट्रेनमध्ये चढण्यासाठी झालेल्या चेंगराचेंगरीत नऊ प्रवासी जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर स्टेशन परिसरात प्रवाशांची सुरळीत वाहतूक आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले.
निर्बंधातून कोणाला मिळणार सूट?
ज्येष्ठ नागरिकांचे मदत करणारी व्यक्ती, महिला प्रवासी, दिव्यांग, अशिक्षित व्यक्तींना किंवा विशेष काळजीची गरज असलेल्यांना या निर्बंधातून सूट देण्यात येईल, असे प्रसिद्धिपत्रकात नमूद आहे. प्रवासाचे आगाऊ नियोजन करावे आणि गर्दी नियंत्रणासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन पश्चिम रेल्वेने प्रवाशांना केले आहे.