
पश्चिम रेल्वे मार्गावर मागील काही महिन्यांपासून रेल्वे अपघात रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रशासनाने रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी 'झिरो डेथ मिशन' अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये वर्षभरात रेल्वे रूळ ओलंडणाऱ्या तब्बल ६ हजार ६०० प्रवाशांवर पश्चिन रेल्वेने कारवाई केली आहे.
''रेल्वे रुळ ओलांडू नका, त्यामुळे जीवाला धोका आहे'' अशा प्रकारच्या घोषणा वारंवार रेल्वे स्थानकामध्ये केल्या जातात; मात्र, रेल्वेकडून वारंवार करण्यात येणाऱ्या सूचनांकडे प्रवासी सहजरित्या दुर्लक्ष करत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. उपनगरीय रेल्वे मार्गांवरील सर्व स्थानकात रेल्वे प्रशासनाकडून पादचारी पूल उभारण्यात आले आहेत; मात्र पादचारी पुलांचा वापर न करता बहुतांश प्रवाशांकडून रूळ ओलांडत प्रवास केला जात आहे. रेल्वे रूळ ओलांडणे हे केवळ बेकायदा नव्हेतर धोकादायकही आहे.
मात्र लवकर पोहोचण्यासाठी जिने चढण्या-उतरण्याचा कंटाळा येत असल्याचे तसेच पादचारी पुलावर गर्दी होत असल्याचे कारण देत प्रवासी सर्रास रेल्वे रूळ ओलांडताना दिसतात. त्यामुळे अपघाती मृत्यू संख्येचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, रेल्वे पोलिसांनी पुन्हा यासाठी कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. 'झिरो डेथ मिशन' अंतर्गत पश्चिम रेल्वेने रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची हालचाल सुलभ करण्यासाठी आणि रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी २०२२-२३ या वर्षात विशेष पावले उचलली. रूळ ओलांडणाऱ्या ६ हजार ६०० जणांवर वर्षभरात कारवाई करण्यात आली असून, याद्वारे १४.५४ लाख रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
सरकते जिने, उद्वाहक यांची भर
पश्चिम रेल्वेवर मुंबई उपनगरीय विभागात १३ नवीन पादचारी पूल कार्यान्वित करण्यात आले आहेत. यामुळे पादचारी पुलांची संख्या १४६ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे या कालावधीत १८ सरकते जिने आणि १५ लिफ्ट देखील कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात सरकते जिन्याची संख्या १०४ वर आणि लिफ्टची संख्या ४९ वर पोहचली आहे. प्लॅटफॉर्मची उंची आणि लोकलच्या दरवाजे यामधील अंतर कमी करण्यासाठी प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांना सुरक्षितपणे ट्रेनमध्ये चढणे आणि उतरवणे शक्य झाले असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
अपघात रोखण्यासाठी या उपाययोजना
- 'रेल्वे रूळ ओलांडू नये' असे स्थानकात सूचना फलक
- जागरूकतेसाठी स्थानकांवर आरपीएफ जवानांकडून मेगाफोनद्वारे नियमित घोषणा
- वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्थानकांवर २४ तास रुग्णवाहिका सुविधा
- रुळांलगतच्या झोपडपट्ट्यांसमोर लोकांनी रेल्वे रूळ ओलांडू नये म्हणून चेतावणी देणारे फलक
"झिरो डेथ मिशनच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. प्रवाशांनी आपल्या मौल्यवान जीवाची काळजी घ्यावी आणि रेल्वे रुळ ओलांडू नयेत. प्लॅटफॉर्म बदलण्यासाठी रेल्वे प्रवाशांनी नेहमी पादचारी पुलाचा, सबवे, सरकते जिने आणि लिफ्टचा वापर करावा."
- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे