Western Railway : सततच्या तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा ९६ टक्क्यांवर घसरला

पश्चिम रेल्वे प्रशासनाला विचारले असता आम्ही सध्या वक्तशीरपणा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले
Western Railway : सततच्या तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा ९६ टक्क्यांवर घसरला

पश्चिम रेल्वेवर काही दिवसांपासून सतत तांत्रिक बिघाड, दुरुस्तीची कामे अथवा लहान-मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत होत प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सद्यस्थितीत १३८३ रेल्वे फेऱ्या पश्चिम रेल्वेवर होत आहेत. मात्र सततचे होणारे बिघाडसत्र यामुळे पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणात घट होत ९६ टक्क्यांवर वक्तशीरपणा घसरला आहे. याबाबत पश्चिम रेल्वे प्रशासनाला विचारले असता आम्ही सध्या वक्तशीरपणा सुधारण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

उपनगरीय रेल्वे मार्गांवर विविध कारणांमुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत होत असते. कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड, कधी ओव्हरहेड वायर तुटल्याच्या घटना तर काहीवेळेस लोकलमधील तांत्रिक बिघाड. या घटनांमुळे रेल्वेच्या वेळापत्रकावर सर्वाधिक परिणाम होत प्रवाशांचा खोळंबा होतो. तर अनेकवेळेस काही लोकल रद्द करण्याच्या निर्णयही प्रशासनाला घ्यावा लागतो. कोरोनानंतर पूर्ववत झालेल्या रेल्वे सेवेत पश्चिम रेल्वेचे रडगाणे कायम आहे. पश्चिम रेल्वेच्या गाड्या आजही स्थानकात ५ ते ७ मिनिटे उशिराने येतात तर अनेकवेळेस बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत होत असल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले. पश्चिम रेल्वेवर करण्यात आलेली विविध तांत्रिक कामे हाती घेताना त्यासाठी वेग मर्यादा, कामाचा कालावधी निश्चित करण्यात येणे आवश्यक असताना त्याबाबत योग्य नियोजन न झाल्याने पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा बिघडला आहे. एप्रिल महिन्यात वक्तशीरपणा ९८ टक्क्यांच्या आसपास असताना जूनमध्ये तो हळूहळू ९७ टक्के आणि ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये हा वक्तशीरपणा ९६.२ टक्क्यांवर घसरला आहे.

गेल्या एक महिन्यापासून दर आठवड्याला तांत्रिक बिघाड होत आहेत. ज्यामुळे रेल्वे सेवांना १५-२० मिनिटे विलंब होत आहे. अशातच नेहमीच्या लोकल गाड्यांमध्ये वातानुकूलित गाड्यांचे वेळापत्रक असल्याने काहीवेळा आणखी विलंब होतो.

- गीता माने, प्रवासी, पश्चिम रेल्वे

logo
marathi.freepressjournal.in