निर्मिती ठिकाणीच ओला व सुका कचरा वर्गीकरण; नागरी सहभाग, जनजागृतीसाठी पालिकेचा पुढाकार

कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांच्या मानसिकतेत बदल घडवणे यासाठीच थेट संवादाची अधिक गरज आहे.
निर्मिती ठिकाणीच ओला व सुका कचरा वर्गीकरण; नागरी सहभाग, जनजागृतीसाठी पालिकेचा पुढाकार

मुंबई : कचरामुक्त मुंबईसाठी कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. यात कचरा उत्पत्तीस्थानाच्या ठिकाणीच ओला किंवा सुका कचरा वर्गीकरण केला जाणार आहे. स्थानिक पातळीवर मुख्यत्वेकरून रहिवासी संस्थांच्या परिसरात कचरा वर्गीकरणाबाबत माहिती, शिक्षण आणि संवाद तसेच जनजागृती केली जाईल. मुंबईत निर्माण होणाऱ्य कचऱ्याचे वर्गीकरण हे उत्पत्ती स्त्रोताच्या ठिकाणीच व्हावे, अशा सूचना बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी दिल्या आहेत.

मुंबईतील रहिवासी संस्थांच्या माध्यमातून १ हजार टन इतका जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करणे, हे घनकचरा व्यवस्थापन विभागासमोरील मोठे आव्हान आहे. त्यामुळेच कचऱ्याच्या उत्पत्तीस्थानाच्या ठिकाणीच वर्गीकरण करण्यासाठी लोकसहभाग वाढवण्याचा महानगरपालिकेचा मानस असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले. या पुढाकाराचा भाग म्हणून माहिती, शिक्षण आणि संवाद तसेच जनजागृतीसाठी संस्थांची नेमणूक करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.

कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांच्या मानसिकतेत बदल घडवणे यासाठीच थेट संवादाची अधिक गरज आहे. म्हणूनच दैनंदिन कचरा संकलन करण्याच्या प्रक्रियेत ओला आणि सुका कचरा वेगवेगळा टाकण्यासाठी हा संवाद घडणे गरजेचे आहे. त्यामुळे ओला कचरा स्वतंत्ररीत्या संकलित करणे शक्य होईल. मुंबईतील कचऱ्याचे उत्पत्तीस्थान हे घरगुती तसेच रहिवासी संकुलातूनदेखील आहे. म्हणूनच माहिती, संवाद आणि शिक्षण अभियानातून तसेच लोकसहभागातून हा बदल घडवून आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले.

जनजागृतीसाठी भित्तीचित्रांचाही वापर

मुंबईतील नागरिकांमध्ये विविध संदेशांच्या भित्तीचित्रांद्वारे आणि उड्डाणपूल, सार्वजनिक ठिकाणे इत्यादींवर सुशोभीकरणाद्वारे जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे. त्यात चित्रे, भित्तीचित्रे इत्यादी प्रकार समाविष्ट असतील. स्वच्छता, कचरा विलगीकरण आणि कचरा व्यवस्थापनाचे महत्त्व या माध्यमातून पटवून देण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in