ठाकरे ब्रँडचे काय होणार? काय आहे संपूर्ण परिस्थिती ?

ठाकरे ब्रँडचे काय होणार? काय आहे संपूर्ण परिस्थिती ?

मराठी माणसांवर होणारा अन्याय, अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर मुंबई आणि ठाकरे हे जणू समीकरणच

कुणाला आवडो न आवडो, पण ‘ब्रँड ठाकरे’ने गेली पाच वर्षे देशाच्या आर्थिक राजधानीवर हुकूमत गाजवली आहे. या ब्रँडची ताकद ही राजकीय असली तरी मुंबईतील सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींवरही ठाकरे ब्रँडचे वलय दिसून येते. पण, आता परिस्थिती बदलत चालली आहे. उद्धव ठाकरे यांचे राजकीय अस्तित्व सध्या पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले असले तरी राज ठाकरे हे सध्या भाजपच्या इशाऱ्यानुसार चालल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, तो म्हणजे ‘ब्रँड ठाकरे’चे काय होणार?

महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्याच्या काही वर्षांनंतरच ‘ब्रँड ठाकरे’ उदयास आला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वडील तसेच उद्धव यांचे आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोठे योगदान दिले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ रोजी मराठी माणसांवर होणारा अन्याय, अत्याचाराच्या विरोधात शिवसेनेची स्थापना झाली. त्यानंतर मुंबई आणि ठाकरे हे जणू समीकरणच बनले.

सामान्य लोकांसाठी काम करणाऱ्या शिवसेनेने राजकीय पाऊल टाकल्यानंतर त्यांना मुंबईचे महापौरपद मिळवण्यासाठी तब्बल १९ वर्षे वाट पाहावी लागली. १९८५ साली छगन भुजबळ हे शिवसेनेचे मुंबईचे पहिले महापौर बनले. १९९५ नंतर मुंबई महापालिकेवर शिवसेनेची अबाधित सत्ता आहे. आक्रमक हा शिवसेनेचा बाणा असून, काही वेळेला आक्रमक धोरण आणि दिवसांतून २४ तास सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध असल्यामुळे शिवसेनेने लोकांच्या मनात स्थान मिळवले. सांस्कृतिक राजकारणावरही शिवसेनेचा प्रभाव असल्यामुळे सेनेची मुंबईवरील पकड आणखीन घट्ट होत गेली. शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचे अनेक कलाकार, लेखक, अभिनेते, अभिनेत्री यांच्याशी वैयक्तिक संबंध असल्यामुळे त्यांनीही शिवसेनेला पाठिंबा दिला. ‘मराठी माणसाचा आवाज’ अशी शिवसेनेची ओळख असल्यामुळे ‘ब्रँड ठाकरे’ची ओळख आणखीन दृढ होत गेली.

बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी प्रादेशिक राजकारणाकडून हिंदुत्वाकडे मोर्चा वळवला. १९८६ मध्ये विलेपार्लेच्या निवडणुकीत त्यांनी प्रथम हिंदुत्वाचा नारा दिला. त्याचा त्यांच्या ब्रँडला कोणताही धक्का पोहोचला नाही. तद्नंतर ‘ब्रँड ठाकरे’ अधिक ताकदवान होत गेला. शिवसेना १९९६मध्ये (१३ दिवसांसाठी) आणि १९९७ ते २००४ या काळात केंद्रात भाजपसोबत सत्तेत होती, तेव्हा या ब्रँडच्या कक्षा आणखीन रुंदावत गेल्या. महाराष्ट्रात १९९५ नंतर ज्या निवडणुका सेना-भाजप युतीने लढवल्या, त्यावेळी ठाकरे ब्रँड हाच एकमेव चेहरा होता.

छगन भुजबळ, नारायण राणे यांसारखे मोठे नेते शिवसेना सोडून गेले, त्यावेळी ठाकरे ब्रँडवर टीका झाली. त्यानंतर बाळासाहेबांचा पुतण्या राज ठाकरे याने शिवसेनेला रामराम ठोकून नव्या पक्षाची स्थापना केल्यावर ठाकरे ब्रँडला मोठा धक्का बसला. त्याचा फटका शिवसेनेला २००९च्या विधानसभा आणि २०१२च्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत बसला. त्यांची राजकीय ताकद कमी झाली असली, तरी बाळ ठाकरे हे सर्वात मोठे ब्रँड होते.

बाळासाहेबांच्या निधनानंतर परिस्थिती बदलत गेली. २०१४च्या विधानसभा निवडणुका भाजपने स्वतंत्रपणे निवडत शिवसेनेपेक्षा जास्त जागा निवडून आणल्या. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमान जपत भाजपसोबत सरकार स्थापन केले. आतापर्यंत राजकारणात लहान भाऊ असलेला भाजप मात्र मोदीलाटेनंतर आपल्या मोठ्या भावाला कायम खाली दाबण्याचा प्रयत्न करत आला.

२०१९च्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र उद्धव यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी सोयरिक साधत सत्ता स्थापन केली. अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद उपभोगल्यानंतर शिवसेनेला त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी दगा दिला. शिवसेनेचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपसोबत सरकार स्थापन केले. या महानाट्यात भाजपचा हात होता, हे उघड आहे. दुसरीकडे, राज ठाकरे यांनीही ‘लाव रे तो व्हिडीओ’ करत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपसमोर आव्हान उभे केले. मात्र, त्यात ते अपयशी ठरले. आता तर त्यांनीही भाजपसोबत हातमिळवणी केली आहे.

एकेकाळी शिवसेनेसोबत असणारा त्यांचा लहान भाऊ भाजप आता राज्याच्या राजकारणात ‘बिग बॉस’ बनला आहे. भाजपने आता मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेतील सत्ता कायम राखण्यात अपयश आले, तर ‘ब्रँड ठाकरे’चे राज्य तसेच राष्ट्रीय राजकारणावरील वलय आणि दबदबा कायमचा नाहीसा होईल.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in