मुंबई विमानतळावर दुर्घटना: व्हीलचेअर न मिळाल्याने चालता चालताच आजोबा कोसळले, हार्टअटॅकमुळे मृत्यू

वृद्ध दांम्पत्याने एअर इंडियाच्या तिकीटासह व्हीलचेअरच्या सुविधेसाठी आगाऊ बुकिंगही केले होते. पण व्हीलचेअर्सच्या कमतरतेमुळे त्यांना एकच व्हीलचेअर वापरावी लागली.
मुंबई विमानतळावर दुर्घटना: व्हीलचेअर न मिळाल्याने चालता चालताच आजोबा कोसळले, हार्टअटॅकमुळे मृत्यू
(प्रातिनिधिक छायाचित्र)

मुंबई विमानतळावर एक धक्कादायक आणि अत्यंत दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. विमानतळावर व्हीलचेअर नसल्यामुळे १२ फेब्रुवारी २०२४ रोजी इमिग्रेशन काउंटरपर्यंत सुमारे १.५ किमी अंतर चालत असताना एक ८० वर्षीय वृद्ध आजोबा कोसळले. रुग्णालयात नेल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या पत्नीसह ते न्यूयॉर्कहून मुंबईचा प्रवास करत होते. विशेष म्हणजे त्यांनी एअर इंडियाच्या तिकिटासह व्हीलचेअरची सुविधाही बूक केली होती. दोघांनी प्रत्येकी एका व्हीलचेअरसाठी बुकिंग केले होते. तरीही, व्हीलचेअर्सच्या कमतरतेमुळे दांम्पत्याला एकच व्हीलचेअर वापरावी लागली.

पत्नी व्हीलचेअर वापरेल आणि पती तिच्यासोबत चालेल असे दोघांनी ठरवले होते. पण, दुर्दैवाने इमिग्रेशन काउंटरवर पोहोचेपर्यंत पती हृदयविकाराच्या झटक्याने कोसळला. त्यांना तातडीने नानावटी रुग्णालयात नेण्यात आले असता तेथे मृत घोषित करण्यात आले. न्यूयॉर्क-मुंबई विमान सकाळी ११.३० वाजता लँड होणार होते, परंतु सोमवारी ते दुपारी २.१० वाजता उशिरा लँड झाले. भारतीय वंशाच्या या वृद्धाकडे अमेरिकेचा पासपोर्ट होता. एअर इंडियाच्या विमान एआय-११६ च्या इकॉनॉमी क्लासमधून ते पत्नीसोबत आले होते. 

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ज्या विमानाने हे जोडपे मुंबईला आले होते, त्या विमानातील ३२ प्रवाशांना व्हीलचेअरची गरज होती. परंतु, केवळ १५ व्हीलचेअर आणि कर्मचारी उपलब्ध होते. तथापि, त्या प्रवाशाला व्हीलचेअरसाठी थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता, परंतु त्यांनी आपल्या जोडीदारासोबत चालण्याचा पर्याय निवडला, असा दावा एअर इंडियाच्या प्रवक्त्याने केला आहे.

"व्हीलचेअरच्या प्रचंड मागणीमुळे, आम्ही प्रवाशाला व्हीलचेअरची वाट बघण्याची विनंती केली होती, परंतु त्याने आपल्या जोडीदारासह चालण्याचा पर्याय निवडला. विमानतळावरील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, प्रवाशाला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले", असे एअर इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे. तसेच, एअर इंडिया शोकग्रस्तांच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात आहे, आवश्यक ती मदत करत आहे. व्हीलचेअर सेवेची मागणी करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला ही सेवा मिळावी असे एअर इंडियाचे स्पष्ट धोरण आहे, असेही कंपनीच्या प्रवक्त्याच्या वतीने सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in