
मुंबर्इ: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना(उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांना उपरोधिक टोमणा मारतांना मुंबर्इत काही चांगले घडले की काहींच्या पोटात दुखते आणि ते पत्र लिहू लागतात असे विधान केले. त्याचवेळी त्यांनी मुंबर्इ महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी खूप चांगले काम केले अशा शब्दात त्यांची स्तुती केली. देवेंद्र फडणवीस बुधवारी माझी माती माझा देश मोहिमेच्या उद्घाटन सोहळ्यात ऑंगस्ट क्रांती मैदानात बोलत होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित होते.
ते म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुंबर्इ आता प्रगती करीत आहे, बदलत आहे. मुंबर्इत सुशोभिकरण आणि कॉंक्रीटायझेशनचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. चले जाव मोहिमेच्या ८१वे वर्ष लागले. त्या निमित्त शहिद स्वातंत्र्य सैनिकांना यावेळी मानवंदना देण्यात आली. फडणवीस पुढे म्हणाले की आता मुंबर्इत चांगले काम होत आहे. पण काही लोकांना पोटशूळ उठला असून ते दररोज पत्र लिहित आहेत. त्यांनी २५ वर्षांपूर्वी स्वतालाच अशी पत्रे लिहिली असती तर मुंबर्इची खूप प्रगती झाल असती, अशा शब्दात त्यांनी आदित्य ठाकरेंवर टिका केली. आठवडाभरापूर्वी आदित्य ठाकरे जे वरळी मतदार संघाचे आमदार आहेत त्यांनी चहल यांना पत्र लिहून मुंबर्इ पूर्व आणि पश्चिम एक्सप्रेसवर मोटारमालकांकडून घेण्यात येणारा टोल रद्द करावा अशी मागणी केली. शिवसेना गेल्या दोन दशकांपासून मुंबर्इ महानगर पालिकेत सत्तेत आहे. मार्च २०२२ पर्यंत पालिकेवर शिवसेनेची सत्ता होती.