जेव्हा मी बोलेन त्यावेळी भूकंप होईल ; रामदास कदमांचा ठाकरेंना इशारा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जेव्हा मी बोलेन त्यावेळी भूकंप होईल ; रामदास कदमांचा ठाकरेंना इशारा
Published on

उद्धव साहेब, तुम्ही माझी पक्षातून हकालपट्टी केलेली नाही, तर मीच माझ्या मनातून तुम्हाला काढले आहे. मी, आजच सगळे बोलणार नाही; पण ज्यावेळी मी बोलेन, त्यावेळी भूकंप होईल,” अशी खळबळजनक प्रतिक्रिया नुकतीच शिवसेनेतून हकालपट्टी झालेले नेते रामदास कदम यांनी दिली. रामदास कदम यांनी त्यांच्या मनातील खदखद मंगळवारी बोलून दाखवली. “राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार हेच शिवसेनेच्या आजच्या अवस्थेला कारणीभूत आहेत,” असा आरोपही त्यांनी केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

रामदास कदम यांची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून आपली व्यथा व्यक्त केली. आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना रामदास कदम इतके भावूक झाले होते की, त्यांना रडूही आवरले नाही. “ज्यांच्यासाठी एवढं केलं, त्यांनीच हकालपट्टी केली. उद्धव साहेब, आणखी किती जणांची हकालपट्टी करणार आहात. ५१ आमदारांची हकालपट्टी केली. उद्या १२ खासदार जातील, त्यांची हकालपट्टी कराल. शेकडो नगरसेवकांची हकालपट्टी केली. आता मातोश्रीवर बसून तुम्हाला केवळ हकालपट्टी करणे एवढे काम राहिले आहे का? ही परिस्थिती का आली, याचे आत्मपरीक्षण करा,” असे आवाहन रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे.रामदास कदम यांनी यावेळी उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. “आदित्य ठाकरे यांचे वय काय? ते आमदारांना काय बोलतात? त्यांनी थोडे तरी भान ठेवावे. आदित्य ठाकरे यांचे गुवाहाटीला गेलेल्या आमदारांबाबतचे वक्तव्य चुकीचे होते,” असे कदम म्हणाले.

शरद पवार शिवसेना फोडण्यात यशस्वी झाले, असा आरोप कदम यांनी केला. “बाळासाहेब असताना जे शरद पवारांना जमले नाही ते पवारांनी उद्धवजींनासोबत घेऊन केले आणि डाव साधला. नशीब अडीच वर्षांत हे थांबले, पाच वर्षांत शिवसेना पूर्णच संपली असती,” असे कदम म्हणाले. “माझा मुलगा योगेश कदम हा आमदार झाला. त्याने अडीच वर्षांत अनेकदा उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; मात्र भेट मिळायचीच नाही. गेली अडीच वर्षे मी प्रचंड अस्वस्थ आहे. रात्रीची झोपही मला येत नाही. मी, प्रसारमाध्यमांशी बोलायचे नाही, असा आदेश मला होता. गेली अडीच वर्षे मी तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाल्ला,” असेही कदम म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in