मुख्यमंत्री संतापतात तेव्हा...; गद्दार म्हणणाऱ्या कार्यकर्त्याचा ठाकरे सेनेत प्रवेश

Maharashtra assembly elections 2024 : आपल्याविरुद्धची टीका विरोधकांनी करणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तरही टीका ज्यांच्यावर होते, ते आपल्यापरीने देत असतातच. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच पंगतीतले.
मुख्यमंत्री संतापतात तेव्हा...; गद्दार म्हणणाऱ्या कार्यकर्त्याचा ठाकरे सेनेत प्रवेश
Published on

मुंबई : आपल्याविरुद्धची टीका विरोधकांनी करणे स्वाभाविक आहे. त्याचे उत्तरही टीका ज्यांच्यावर होते, ते आपल्यापरीने देत असतातच. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच पंगतीतले.

मात्र एकाने आपल्याला थेट गद्दार म्हटलेले मुख्यमंत्र्यांना मंगळवारी सहन झाले नाही आणि तेही महायुतीचा एक घटकपक्ष असलेल्या रिपाइंच्या कार्यकर्त्याने. तेव्हा शिंदे यांनी त्याचा जाब विचारला आणि मग त्याचा शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश आणि त्याची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी अशी वेगवान घडामोड मंगळवारी एकाच दिवशी घडली.

मुख्यमंत्री शिंदे यांचा ताफा मंगळवारी चांदिवली विधानसभा मतदारसंघातील साकीनाका येथून जात होता. त्यावेळी ताफ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न करणारा संतोष कटके हा तरूण हातात काळे झेंडे घेऊन गद्दार असा नारा देत होता.

शिंदे हे लगेचच कारमधून उतरत या कार्यकर्त्याच्या दिशेने गेले. परिसरात असलेल्या काँग्रेसचे नेते नसीम खान यांच्या कार्यालयात ते गेले. तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना असेच शिकवता का, असा सवाल शिंदे यांनी केला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नव्या वादाला तोंड फुटले.

कटके या तरुणाला नंतर ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र काही वेळातच त्याची सुटका करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संतोष याला मातोश्रीवर नेले. तेथे पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्याचा सत्कार केला. विशेष म्हणजे संतोष याचा त्याचे वडील साधू कटके यांच्यासह पक्षप्रवेश करण्यात आला. साधू कटके हे शिंदे मुख्यमंत्री असलेल्या महायुतीतील एक घटक पक्ष रिपब्लिकन पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्र्यांना पाहून मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही, असे संतोष कटके याने पत्रकारांना सांगितले.

शिवसेनेच्या राज्यसभा सदस्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही 'मेरा बाप गद्दार है' या वाक्याचा वापर करून मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत यांच्यावर निशाणा साधला होता.

अखेर साधू कटके यांची रिपाइंतून हकालपट्टी

मंगळवारच्या वेगवान घडामोडीनंतर रिपब्लिकन पक्षाचे उत्तर-मध्य मुंबई जिल्हा अध्यक्ष साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार साधू कटके यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे व मुंबई प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांनी केली. रिपब्लिकन पक्षाने म्हटले आहे की, मुख्यमंत्रीपद संविधानिक पद आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीचे नेते आहेत. त्यांच्याविरुद्ध अपशब्द काढून त्यांचा अवमान करण्याचा केलेला प्रयत्न हा अक्षम्य आहे. या अवमानकारक वक्तव्याबाबत साधू कटके आणि त्यांचा पुत्र संतोष कटके यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आहे.

logo
marathi.freepressjournal.in