आम्ही कपडे कुठे बदलायचे? कामाठीपुरातील महिला सफाई कामगारांचा सवाल

सफाईसाठीचे सर्व साहित्य या ठिकाणी भरून ठेवले असल्याने उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट सतत असतो. त्यामुळे कामगारांना या चौक्यांमध्ये बसण्याची जागा नाही.
आम्ही कपडे कुठे बदलायचे? कामाठीपुरातील महिला सफाई कामगारांचा सवाल
Published on

पूनम पोळ/ मुंबई

मासिक पाळीदरम्यान शौचालयात उशीर झाल्याने बाहेरून होणारी आरडाओरड, कपडे बदलताना फाटलेल्या छतातून कोणीतरी पाहतय याची सतत भीती, सामान काढताना अंगावर येणारे घुशी, उंदीर आणि जागेअभावी शौचालयाबाहेर दुर्गंधीत जेवायला बसणारे पालिकेचे महिला व पुरुष सफाई कर्मचारी, ही समस्या आहे पालिकेच्या कामाठीपुरा विभागातील सफाई कर्मचाऱ्यांची. या ठिकाणच्या सफाई कामगारांच्या चौक्यांची दुरवस्था झाली आहे. त्याबाबत पालिकेकडे गेल्या ५ वर्षांपासून तक्रार करण्यात येत आहे. मात्र, पालिकेचे अधिकारी त्याकडे जाणूनबुजून कानाडोळा करत असल्याचा आरोप म्युन्सिपल मजदूर युनियनच्या सहाय्यक सरचिटणीस प्रफुल्लता दळवी यांनी केला आहे.

कामाठीपुरा या ठिकाणच्या गल्ली क्रमांक १५ समोर तीन चौक्या आहेत. या विभागात एकूण १२० सफाई कर्मचारी काम करतात. यापैकी ४० ते ५० महिला कामगार आहेत. या चौक्यांची लांबी-रुंदी जेमतेम आहे. तेथे बसायला जागा मिळत नाही. त्यामुळे आमचे जेवण हे शौचालयाबाहेर असलेल्या जागेतच होते. खरी अडचण मासिक पाळीदरम्यान येते. कॉमन शौचालय असल्याने थोडासा उशीर झाला. तर बाहेर आरडाओरड होत असल्याचे महिला सफाई कर्मचारी सांगतात.

सोबतीला मांजर, कुत्र्याची पिल्ले

सफाईसाठीचे सर्व साहित्य या ठिकाणी भरून ठेवले असल्याने उंदीर आणि घुशींचा सुळसुळाट सतत असतो. त्यामुळे कामगारांना या चौक्यांमध्ये बसण्याची जागा नाही. त्यांना कोपऱ्यात उभे राहून कपडे बदलावे लागतात. या ठिकाणी कंटेनर हे पत्र्याचे असल्याने त्याला पावसाळ्यात शॉक लागत असतो, तर त्याच्यावर असलेले छप्पर हे गळके आणि त्यातून नेहमी किडे पडत असतात, अशी माहिती पुरुष कर्मचाऱ्यांनी दिली. तर या जागेत आमच्यासोबत घुशी, मांजर, कुत्र्याची पिल्लेही राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

सफाई कामगारांची, विशेष करून महिला कामगारांची कुठलीही गैरसोय होत नाही. सफाई कामगारांना आवश्यक असलेल्या सर्व बाबी पालिकेमार्फत पुरवल्या जातात. त्यामुळे अशा बाबतच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झालेल्या नाहीत. जर असे काही असेल तर त्यावर नक्की तोडगा काढला जाईल.

- किरण दिघावकर, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन

याबाबत पालिकेला विनंती केली, स्मरणपत्रे पाठवली आहेत. या चौक्यांच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद करण्याबाबत चर्चा झाली. मात्र निधी मिळाला नाही. जवळच्या शाळेच्या इमारतीतील दोन रिक्त खोल्या देण्याची मागणी करत आहोत. मात्र त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. याबाबत निर्णय झाला नाही, तर १ मार्चपासून काम बंदचा निर्णय घेतला आहे.

- अशोक सावंत, संघटक, म्युनीसिपल मजदूर युनियन

logo
marathi.freepressjournal.in