मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर सीबीआयने तपास केला. सीबीआयच्या तपासाला चार वर्षे पूर्ण होत आली तरी सीबीआयचा अहवाल जाहीर करण्यात आलेला नाही. सुशांतच्या आत्महत्येला हत्येचे रूप देऊन भाजपने कुटील राजकीय हेतू साधण्यासाठी वापर केला, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
मविआ सरकार असताना महाराष्ट्रात सीबीआय तपासाला परवानगी नसल्याने बिहारमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवून सीबीआयकडे तपास वर्ग करण्यात आला. परंतु तपासाला चार वर्षे झाली तरी सीबीआय या प्रकरणावर गप्प का आहे, असा प्रश्न सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.
“भारतीय जनता पक्षाने तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येचेही भाजपने राजकारण केले. सुशांतने आत्महत्या केल्याचे मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले होते. अत्यंत प्रथितयश म्हणून मान्यता प्राप्त अशा एम्स या संस्थेनेही त्यांच्या अहवालात आत्महत्याच असल्याचे स्पष्ट केले. त्याला आता चार वर्षे उलटली आहेत. भाजपने केवळ हीन राजकीय हेतूने मुंबई पोलीस, मविआ सरकारची बदनामी केली व सुशांत सिंहच्या कुटुंबियांनाही वेठीस धरले. तीन तपास यंत्रणांचा वापर करण्यात आला. अनेकांचा तपासात छळ केला,” असेही सावंत म्हणाले.
“सुशांतसिंह प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून सीबीआयला तोंड उघडायला लावावे, अशी विनंती सुशांतच्या मोठ्या बहिणीने केली आहे. परंतु अद्याप मोदींनी या प्रकरणी ना हस्तक्षेप केला, ना सीबीआयचे तोंड उघडले. सुशांतच्या आत्महत्येस १४६० दिवस झाले, पण सीबीआय तोंड कधी उघडणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे,” असेही सचिन सावंत म्हणाले.