अजित पवार यांनी भाजप प्रणित शिंदे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर आपला दावा सांगितला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमकं कोणाचा? तसंच पक्षाचं नाव आणि चिन्हावर ताबा कोणाचा? असा प्रश्न उपस्थित झाला. यानंतर हा वाद निवडणूक आयोगाच्या दारात पोहचला. आता हा वाद निकाली निघण्याची शक्यता आहे. कायदेतज्ज्ञांसोबत दीर्घ विचारमंथन केल्यानंतर निवडणूक आयोग आता हा वाद पूर्णपणे निकाली काढणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आयोगाने हा वाद निकाली काढण्यासाठी कायदेतज्ज्ञांसोबत अनेक बैठका घेतल्या आहेत. आयोगासमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी आयोगाने ६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना(शरद पवार आणि अजित पवार गट) वैयक्तिकरित्या बोलावलं आहे.
राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडून लवकरात लवकर लागण्याची शक्यता सांगितली जात आहे. दरम्यान,पाच राज्यांच्या निवडणुकांपूर्वी या प्रकारचे सर्व वाद मिटवण्याच्या तयारीत निवडणूक आयोग व्यस्त असल्याचं सांगितलं जात आहे. कारण या निवडणुकांनंतर लगेचच निवडणूक आयोग सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीत व्यस्त होणार आहे. यामुळे अशा सर्व वादांना तोंड देण्यासाठी आयोगाकडे वेळ नाही. यासोबतच सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान पक्षाबाबत कोणताही नवा वाद निर्माण होण्यापूर्वी आयोगाला संपूर्ण प्रकरण निकाली काढायचं आहे.
अजित पवार यांनी स्वत:ला राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष घोषित केल्यावर आणि समर्थक आमदारांसह शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये सामील झाल्यापासून राष्ट्रवादीवरील हक्कांसाठीचा हा लढा सुरू झाला. यानंतर निवडणूक आयोगापुढे याचिका दाखल करून पक्ष आणि निवडणूक चिन्हावर आपला दावा मांडला. अजित पवार गटाने केलेल्या दाव्यानंतर शरद पवार गटानेही आयोगाला ई-मेल पाठवून पक्षावर आपला दावा मांडला होता.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने नुकतीच नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करून हा संपूर्ण वाद आणखी वाढवला असताना आयोगाने यासंदर्भातील निकाल लावण्यासाठी गती दाखवली आहे. अजित पवार गटाने अजित पवार यांना राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्ष बनवण्याबरोबरच सात राष्ट्रीय सरचिटणीस आणि पाच राष्ट्रीय सचिवांची नावेही जाहीर करण्यात आली आहेत. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही ही माहिती आयोगाला दिली आहे. आता निवडणूक आयोगाच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.