भाजप शिवसेनेत वरचढ कोण?

भाजप शिवसेनेत वरचढ कोण?
Published on

जून महिना महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या वेळी पूर्वीच्या दोन्ही मित्र पक्षांत खरी लढाई आहे. या लढाईत वरचढ कोण होणार, यावर मुंबई तथा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे महत्त्व ठरणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी, तर विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होणार आहे. राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार असल्याने चुरस वाढली आहे. विशेष म्हणजे, या सहाव्या जागेसाठी जुने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व भाजपात निवडणुकीचे दूरगामी परिणाम लक्षात घेतले तर चुरशीची लढत होणार आहे.

विशेष म्हणजे, कोल्हापूरचे दोन मल्ल या निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. याआधी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविलेले मुन्ना तथा धनंजय महाडिक आता भाजपकडून लढत आहेत. तर त्यांच्या विरोधात शिवसेनेने संभाजीराजेंचा पत्ता काटून संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे. सहावी जागा निवडून आणण्यासाठी सेना व भाजपजवळ बहुमत नाही. अतिरिक्त मते खेचण्याकडे लक्ष लागल्याने चुरस वाढली आहे. येथे कसे आहे, समाजवादी, एमआयएम, कम्युनिस्ट या पक्षाच्या आमदारांना शिवसेना, भाजप हे दोन्ही पक्ष राजकीयदृष्ट्या बहिष्कृत आहेत. भाजपला हरविण्यासाठी त्यांच्या पक्षाचे आमदार मतदान करतील, अशी शक्यता नाही. तीच स्थिती शिवसेनेची आहे. यामुळे रस्सीखेच वाढणार असून सहावा उमेदवार कितव्या फेरीवर निवडून येतो, याचा अंदाज या दोन्ही पक्षांना नाही. असे असले तरी मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू झाला आहे. निर्णायक ठरणाऱ्या पक्षांनी व नेत्यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यास घेतली आहे.

शेवटच्या चार दिवसांत मोठी उलाढाल होऊ शकते. काही निर्णायक ठरणाऱ्या लहान पक्षांनी आपली भूमिका जाहीर करण्यास सुरुवात केली असल्याने महाविकास आघाडीत खळबळ माजली आहे. वसई-पालघरमधील बहुजन विकास आघाडीने शांत भूमिका जाहीर केली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे की, आम्ही सध्या महाविकास आघाडीबरोबर असलो तरी राज्यसभा निवडणुकीत भाजपसोबत जाऊ शकतो; परंतु आ. हितेंद्र ठाकूर यांच्यावर राष्ट्रवादीचे शरद पवार यांचा दबाव आला तर ते महाविकास आघाडीकडे परतू शकतात; परंतु हितेंद्र ठाकूर यांना वसई-पालघर महानगरपालिका निवडणुका महत्त्वाच्या असल्याने त्यांना शिवसेनेपेक्षा भाजप हा जवळचा वाटणार आहे, यात शंका नाही. समाजवादी पक्षाचे दोन आमदार आहेत. सध्या समाजवादी पक्ष हा महाविकास आघाडीसोबत असला तरी त्यांच्या पक्षाचे महाराष्ट्रातील नेते अबू आझमी शिवसेनेला मतदान करण्यास उत्सुक नाहीत.

आता त्यांनी अखिलेश यादव या पक्षश्रेष्ठीकडे संमती मागितली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भाजपची कोंडी करण्यासाठी व हिंदुत्ववादी मतांमध्ये विभागणी करण्यासाठी अखिलेश यादव यांना मदत व्हावी, यासाठी शिवसेनेने उत्तर प्रदेशमध्ये उमेदवार उभा केले होते. उत्तर प्रदेशच्या राजकारणात भाजप विरुद्ध समाजवादी असा संघर्ष आहे. तो लक्षात घेऊन समाजवादी पक्षाच्या दोन्ही आमदारांनी शिवसेनेला मतदान केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही; परंतु राजकीय दृष्टिकोनातून पाहिल्यास महाराष्ट्र विरुद्ध अबू आझमी असा संघर्ष कायम राहिला आहे. विशेष म्हणजे, जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे व इचलकरंजीचे पूर्वीचे काँग्रेसचे नेते प्रकाश आवाडे यांनी तर भाजपसमवेत उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचे जाहीर समर्थन केले होते, तर स्वाभिमानी पक्षाचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडीतून फारकत घेतली आहे, हे पाहता मोरशीमधून निवडून आलेले त्यांचे आमदार देवेंद्रकुमार यांचे मतही निर्णायक ठरण्यास मदत होऊ शकते.

मेळघाटमधील प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल, अमरावतीमधील अपक्ष रवी राणा हे भाजपकडे असल्याचे त्यांनी जाहीरपणे स्पष्ट केले आहे. तर मनसेचे एकमेव आमदार हेही नियोजित स्थितीवरून भाजपकडे जातील, अशीच शक्यता आहे. नंदूरबारच्या मंजुळा गावित, मीरा-भाईंदरच्या गीता जैन, भंडाराचे अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांची मतेही या राज्यसभा निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात.

मेळघाटचे राजकुमार पटेल यांना शिवसेनेपेक्षा भाजप जवळची वाटत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. रामटेकचे आशिष जैसवाल यांना शिवसेनेने महामंडळावर घेतले आहे, तर क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे शंकरराव गडाख यांनी तर शिवबंधन बांधले असून, त्यांनी राज्यमंत्रिमंडळाच्या कोट्यातून ते मंत्री आहेत. या निवडणुकीत एमआयएम हा महत्त्वाचा घटक राहणार असून, त्यांची दोन्ही मते निर्णायक ठरू शकतात. उद्या ते तटस्थ राहिल्यास आश्‍चर्य वाटणार नाही. कारण त्यांना शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष अस्पृश्य आहेत. शिवसेनेने या सहाव्या जागेसाठी मोठे राजकारण केल्याचे मागील आठवड्यात दिसून आले. कोल्हापूरचे शाहू महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांना उमेदवारी देण्याबाबत ज्या चर्चा झाल्या, त्यामधून शिवसेनेला फारसे काही हाती लागले नाही. उलट त्यामुळे मराठा समाज महासंघाचे नेते नाराज झाल्याचे पुढे आले आहे.

याकरिता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शाहू महाराजांची भेटही घेतली होती. त्यातून वादच निर्माण झाले होते. प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे सध्या मंत्री असून, त्यांच्या पक्षाचे दोन्ही आमदार शिवसेना उमेदवार संजय पवार यांच्याकडे जातील, अशी शक्यता वर्तवली जाते. विधानसभेत मार्क्सवादी पक्षाचा एकच सदस्य असून तो नेहमीप्रमाणे तटस्थ राहील, असे दिसते. कारण त्यांनी नुकताच डहाणूमध्ये भाष्य केले होते. शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर लोहामधून श्यामसुंदर शिंदे हे निवडून आले आहेत. त्यांनी शिवबंधन बांधले आहे. या छोट्या पक्षाचे सदस्य व अपक्ष आमदार हे या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहेत.

काँग्रेसचे ४४ सदस्य असून त्यांच्या पक्षाने महाराष्ट्राबाहेरचा उमेदवार दिल्याने त्यांच्या आमदारांमध्ये खदखद आहे. त्यांचे पक्षाकडून काही घडले नाही तर त्यांच्याकडे दोन मते अतिरिक्त असली तरी त्यांचे नेते धोका पत्करण्यास तयार नाहीत. त्यामुळे हे आमदार पहिल्या फेरीत काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करून दुसऱ्या व तिसऱ्या फेरीत वेगळ्या पद्धतीने मतदान करू शकतात. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेस आमदारांवर दबाव वाढत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे दुसऱ्यांदा बॅकफूटवर गेले आहेत. प्रारंभी त्यांनी संभाजीराजे हे अपक्ष उभे राहिल्यास आपल्याकडे असलेली ११ अतिरिक्त मते देऊ, असे जाहीर केले होते व त्यावर नंतर घुमजाव करून शिवसेना उमेदवाराला मतदान करण्याचे जाहीर केले आहे. यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे नेते संतप्त झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे यामध्ये हिरो ठरले आहेत. त्यांनी शरद पवारांना स्पष्ट शब्दात सुनावले की, “आपण शिवसेनेच्या सातव्या उमेदवारास पाठिंबा देऊ.” असे यापूर्वी स्पष्ट केले होते.

logo
marathi.freepressjournal.in