
मुंबई : 'चल हल्ला बोल' या मराठी चित्रपटातील महाकवी नामदेव ढसाळ यांची, रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो... ही कविता काढा. तसेच कोण नामदेव ढसाळ असा उर्मट सवाल करणाऱ्या सेन्सॉर बोर्डविरोधातच आता 'चल हल्ला बोल' असा थेट इशारा विविध जनसंघटना आणि कार्यकर्त्यांनी दिला आहे. सोमवार, ३ मार्च रोजी लोकांचा सिनेमा चळवळ, दलित पँथर, लोकांचे दोस्त, कष्टकरी शेतकरी संघटना, चर्मकार समाज, मातंग प्रतिष्ठान, संभाजी ब्रिगेड, भारतीय महिला फेडरेशन आदी संघटनांनी दादर (पूर्व) स्थानकाबाहेर निदर्शने केली. यावेळी लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
लोकांचा सिनेमा चळवळीच्या माध्यमातून लेखक, दिग्दर्शक महेश बनसोडे यांनी लोक वर्गणीतून 'चल हल्ला बोल' हा सिनेमा बनवला आहे. दलित पँथर, युक्रांद या चळवळींच्या पार्श्वभूमीवर दलित, आदिवासी, भटके विमुक्त, अल्पसंख्यांक, मुस्लिम, शेतकरी, स्त्रिया आदींच्या शोषणाविरुद्ध लढ्याची भूमिका मांडणारा हा चित्रपट आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला परवानगी नाकारली.
सेन्सॉर बोर्ड अभिव्यक्तीवर बंदी आणत असल्याचे दोस्त संघटनेचे रवी भिलाणे यांनी स्पष्ट केले. यावेळी सुप्रसिद्ध लोकशाहीर संभाजी भगत, डॉ. स्वप्नील ढसाळ, संगीता ढसाळ, पँथर सुमेध जाधव, कॉमेड सुबोध मोरे, ज्योती बडेकर, संभाजी ब्रिगेडचे प्रमोद शिंदे, कष्टकऱ्यांचे नेते विठ्ठलभाऊ लाड, काँग्रेसचे युवराज मोहिते, कॉम्रेड शैलेंद्र कांबळे आदी उपस्थित होते.