हार्बर मार्गावरील डॉकयार्ड स्थानकाच्या असुरक्षेतेला जबाबदार कोण ?

अनेक वर्षांपासून अशा अवस्थेत डॉकयार्ड स्थानक उभे असताना पावसाळ्यात स्थानकाच्या भिंती मात्र खचून गेल्या आहेत.
हार्बर मार्गावरील डॉकयार्ड स्थानकाच्या असुरक्षेतेला जबाबदार कोण ?

पावसाळा आला की दरवर्षी जुन्या इमारती कोसळण्याच्या दुर्घटना घडतात. या इमारती कोसळून जीवित व वित्तहानी होण्याच्या घटना वारंवार होत असतात. मात्र मोडकळीस, नादुरुस्त या उपमा इमारतींपुरत्याच मर्यादित नसून हार्बर मार्गावरील डॉकयार्ड स्थानकाची अवस्था देखील काहीशी अशीच असल्याचे निदर्शनास आले आहे. दोन फलाटांचे रेल्वे स्थानक मात्र 'नीचे दुकान, ऊपर मकान' या पद्धतीने खाली रेल्वे स्थानक आणि त्यावर इमल्यांवर इमले बांधलेल्या ३०० हून अधिक अनधिकृत झोपडपट्ट्या. मागील अनेक वर्षांपासून अशा अवस्थेत डॉकयार्ड स्थानक उभे असताना पावसाळ्यात स्थानकाच्या भिंती मात्र खचून गेल्या आहेत.

सीएसएमटीहून पनवेलला जाणाऱ्या फलाटाच्या भिंतीना जागोजागी तडे गेले आहेत. काही भिंतींचे स्लॅप पडले आहेत, तर काही भिंती शेवाळलेल्या अवस्थेत शेवटच्या घटक मोजत आहेत. दरम्यान, स्थानकावर नैसर्गिक डोंगर आणि त्यावर असलेल्या झोपडपट्ट्या आणि त्यातून पाझरणारे पाणी चक्क स्थानकातून ओघळताना दिसते आहे. अशा जीर्ण, नादुरुस्त स्थानकातून हजारो प्रवासी दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याने भविष्यात काही दुर्घटना घडली तर प्रवाशांच्या असुरक्षिततेला जबाबदार कोण? असा सवाल प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

डॉकयार्ड रेल्वे स्थानक हार्बर मार्गावरील एक स्थानक. इतर स्थानकांच्या तुलनेने या स्थानकात प्रवासी संख्या कमी असली तरी भायखळा, माझगाव याठिकाणी नोकरी धंद्यासाठी येणारे चाकरमानी कुर्ल्यावरून रेल्वे बदली करण्याऐवजी हार्बरवरील डॉकयार्ड रेल्वे स्थानकाचा सर्वाधिक वापर करतात. प्रतिदिन हजारो प्रवासी या स्थानकातून ये-जा करतात. परंतु कधी तिकीट खिडक्यांवर चोरांचा डल्ला, तर कधी गर्दुल्ल्यांच्या वावरामुळे प्रवासी त्रस्त. या समस्या कायम असतानाच आता डॉकयार्ड रेल्वे स्थानकाच्या आयुर्मानाचा प्रश्न उद्भवला आहे. या स्थानकाच्या दुरुस्तीकडे मध्य रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने या स्थानकातील भिंती जीर्णावस्थेत आहेत.

अनके ठिकाणी भिंतींना तडे गेल्याने त्याठिकाणाहून पावसाळ्यात प्रवाशांना स्थानकावरील भागात वास्तव्यास असणाऱ्या अनधिकृत झोपडपट्ट्यांमधून येणारे पाणी, घाण याचा सामना करावा लागत आहे. शेवाळलेल्या भिंती, झोपडपट्ट्यांचा वाढता भार, तुटलेले पत्रे यासोबत अस्वच्छ स्थानक, रेल्वे पोलिसांचा नसलेला वावर आणि गर्दुल्ल्यांची वाढती संख्या यामुळे प्रवासी त्रासले आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in