शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा कोणाचा होणार?पालिकेच्या विधी विभागाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

शिवसेना आणि शिंदे गटाने या मैदानासाठी दावा केल्यामुळे पालिकेची अडचण वाढली आहे.
शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा कोणाचा होणार?पालिकेच्या विधी विभागाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष

‘फर्स्ट कम फर्स्ट’ या आधारावर बीकेसीतील मैदानाची परवानगी शिंदे गटाला एमएमआरडीएने दिली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाकडे परवानगीचा अर्ज २२ ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या वतीने अनिल देसाई यांनी दाखल केला आहे. त्यामुळे ‘फर्स्ट कम फर्स्ट’ या आधारावर शिवाजी पार्क मैदानात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दसरा मेळाव्याची परवानगी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे; मात्र मुंबई महापालिकेच्या ‘जी उत्तर’ विभागाने सावध भूमिका घेत पालिकेच्या विधी विभागाचा सल्ला मागितला आहे. त्यामुळे विधी विभाग काय निर्णय घेणार? याकडे शिवसेनेसह राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

शिवाजी पार्क कोणाला द्यायचे, याची चाचपणी पालिका प्रशासनाकडून चालू आहे. शिवसेना आणि शिंदे गटाने या मैदानासाठी दावा केल्यामुळे पालिकेची अडचण वाढली आहे. त्यामुळे पालिकेने हे मैदान कोणाला द्यायचे याबाबत पडताळणी करण्यासाठी पालिका प्रशासनाने हा प्रश्न विधी विभागाकडे सोपविला आहे. विधी विभागाचा अभिप्राय मिळाल्यानंतर मैदान कोणाला द्यायचे यावर निर्णय होईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली. प्रशासक नियुक्त होण्यापूर्वी पालिकेवर शिवसेनेची सत्ता होती.

आता प्रशासक नेमल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते असल्याने पालिकेवर त्यांचा वचक आहे; मात्र शिवसेना मागील ५६ वर्षांपासून या मैदानावर दसरा मेळावा घेत आली आहे. शिवाय, यंदा परवानगीसाठी पहिला अर्ज शिवसेनेने केला आहे. त्यामुळे मैदान कुणाला असा पेच पालिकेपुढे निर्माण झाला आहे.

राजकीय वाद रंगणार

विधी विभागाच्या अभिप्रायानंतरच यावर निर्णय घेतला जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असून विधी विभाग याच आठवड्यात आपला अभिप्राय देण्याची शक्यता आहे. विधी विभागाच्या अभिप्रायासह अहवाल पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्याकडे पाठवला जाईल व त्यानंतर आयुक्त दसरा मेळाव्यासाठी कोणाला परवानगी द्यायची याचा निर्णय जाहीर करतील. दरम्यान, शिवाजी पार्क कुणालाही न मिळाल्यास राजकीय वाद अधिक रंगणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in