मुंबईत आज आवाज कुणाचा? शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार

शिवसेनेतील बंडावर उद्धव ठाकरे नेमका कसा प्रहार करणार, हे ऐकण्यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत
मुंबईत आज आवाज कुणाचा? शिवसेनेचे दोन दसरा मेळावे होणार

शिवसेनेतील ऐतिहासिक बंडामुळे मुंबईत पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाचा दसरा मेळावा ऐतिहासिक शिवाजी पार्कवर होत असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा बीकेसी मैदानात होणार आहे. खरी शिवसेना आमचीच, असा दावा दोन्ही गटांकडून करण्यात येत असून, त्यासाठी जोरदार शक्तिप्रदर्शन बुधवारी केले जाणार आहे. त्यामुळे दसऱ्याच्या दिवशी मुंबईत ‘आवाज कुणाचा’ घुमणार हे स्पष्ट होणार आहे.

शिवसेनेतील बंडावर उद्धव ठाकरे नेमका कसा प्रहार करणार, हे ऐकण्यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात ठाकरे गटाला आणखी धक्के दिले जाणार असल्याची चर्चा आहे. दोन्ही गटांचे शिवसैनिक राज्यभरातून मुंबईत दाखल होत आहेत. त्यामुळे मुंबईतील वाहतूक व्यवस्था उद्या कोलमडेल की काय, अशी शंका निर्माण झाली आहे. वाहतूक व्यवस्था नीट राखण्यासोबतच मुंबईतील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे मोठे आव्हान मुंबई पोलिसांसमोर असणार आहे.

शिवसेनेच्या इतिहासात याआधीही पक्षात फूट पडली; पण कुणी शिवसेनेच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्यावर कधी दावा केला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र बंडखोरीनंतर खरी शिवसेना आपलीच, असा दावा करत दसरा मेळाव्यावरही हक्क सांगितला आहे.

शिंदे गटाच्या मेळाव्यात आणखी धक्कादायक प्रवेश?

शिंदे गटाच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे यांचे भाषण हेच मुख्य आकर्षण असणार आहे. आपल्या भाषणात शिंदे हे आणखी काही धक्कादायक गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. शिंदे यांच्या दसरा मेळाव्यात अनेक धक्कादायक प्रवेश होण्याचीदेखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याआधी रामदास कदम, मंत्री गुलाबराव पाटील, आमदार शहाजीबापू पाटील आदींची भाषणे होण्याची शक्यता आहे. अयोध्येचे महंतही या मेळाव्याला येण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंची अस्तित्वाची लढाई

दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आता अस्तित्वाचीच लढाई आहे. सध्या शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’देखील हातचे जाते की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी दसरा मेळावा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा आहे. या दसरा मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेनेची पुढील राजकीय दिशा स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणाविषयी शिवसैनिकांमध्ये उत्सुकता आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरेही या मेळाव्यात बंडखोरांवर तुटून पडण्याची शक्यता आहे.

“शिंदे गटाने बसेससाठी १० कोटीची कॅश भरल्याचे माझ्या वाचनात आले. ज्यांनी देशात नोटाबंदीचा निर्णय लागू केला, त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निदर्शनास ही बाब मी आणून देणार आहे. एवढी कॅश आली कठून? हा प्रश्न आहे. कारण याच मुद्द्यावर आम्ही संसदेत फारच गंभीरपणे चर्चा केली आहे. त्यामुळे याची चौकशी व्हायला पाहिजे,” अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

दसरा मेळाव्यावरून देवेंद्र फडणवीसांचा नेत्यांना इशारा

दसरा मेळाव्यात शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून प्रक्षोभक भाषणे झाल्यास राज्यात कायदा - सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांना इशारा दिला आहे. “भाषणे करताना कायदा मोडला तर कायदा आपले काम करेल. नेत्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून भाषणे करावीत,” असा सल्ला त्यांनी दिला आहे.

दोन हजार पोलीस तैनात

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दसरा मेळाव्याच्या युद्धासाठी सज्ज झाले आहेत. बुधवारी सायंकाळी होणाऱ्या या मेळाव्यांसाठी दोन्ही गटांकडून लाखो कार्यकर्त्यांना मुंबईत आणले जात आहे. यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा होऊ नये, यासाठी दोन हजारांहून अधिक पोलीस मुंबईतील रस्त्यांवर तैनात करण्यात येणार आहेत.

१८०० एसटी, तीन हजार खासगी गाड्या बुक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने १८०० एसटी गाड्या व तीन हजार खासगी गाड्या बुक केल्या आहेत. यासाठी तब्बल १० कोटी रुपये रोख भरल्याचे समजते. प्रत्येक शिवसैनिकाची मुंबईत येण्यापासून राहण्या-खाण्यापर्यंतची व्यवस्था होईल, अशी तयारी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

१४ हजार वाहने मुंबईत

दसरा मेळाव्याच्या दिवशी दोन्ही गटांकडून सुमारे चार हजार बस आणि १० हजार छोटी वाहने मुंबईत येण्याचा अंदाज मुंबई पोलिसांचा आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने ठिकठिकाणी मुंबई पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in