
मुंबई : मुंबई महापालिकेने कचरामुक्त मुंबईची घोषणा करत कोट्यवधी रुपयांचा खर्च केला असला, तरी प्रत्यक्षात कचरामुक्त मुंबईचे स्वप्न दूरच राहिल्याचे वास्तव आमदार वर्षा गायकवाड यांनी उघडकीस आणले आहे. धारावीतील इंदिरानगर परिसरातील कचऱ्याच्या साम्राज्याचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत पालिकेच्या कचरामुक्त मुंबईच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अशा दुर्गंधीयुक्त वातावरणात लोकांनी कसे जगायचे, असा सवालही त्यांनी विचारला आहे.
मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईतील विविध प्रश्नांना वाचा फोडायला सुरुवात केली आहे. याच अभियानाचा भाग म्हणून त्यांनी धारावीतील इंदिरा नगर परिसराला भेट दिली. इंदिरा नगर परिसरात पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य पाहून त्यांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरले आहे.
सुशोभीकरणाच्या नावाखाली थातुरमातूर रंगरंगोटी
मुंबई महापालिकेने कचरामुक्त मुंबईची घोषणा करत त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली होती; मात्र सुशोभीकरणाच्या नावाखाली थातुरमातूर रंगरंगोटी करून काही ठिकाणी दिवे बसवून करदात्यांचे पैसे लुटण्याचे कारस्थान सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप आमदार गायकवाड यांनी केला. इंदिरा नगर येथील कचऱ्याचे फोटो शेअर करत त्यांनी नागरिकांच्या आरोग्याबाबतही काळजी व्यक्त केली. यानंतर तरी पालिका प्रशासनाला आणि सरकारला जाग येईल का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.