मुंबईत प्लास्टिकचा सर्रास वापर : मोहीम पुन्हा तीव्र करण्याच्या हालचाली

मुंबईत प्लास्टिकचा सर्रास वापर : मोहीम पुन्हा तीव्र करण्याच्या हालचाली

मुंबईत प्लास्टिक पिशव्यांवर धडाक्यात सुरू करण्यात आलेली कारवाई आता थंडावली आहे. मागील अडीच वर्षांपासून फेरीवाले, दुकानदार, बाजारपेठात सर्रास प्लास्टिकचा वापर केला जातो आहे. कोरोना नियंत्रणात आल्याने आता प्लास्टिक कारवाई पुन्हा तीव्र केली जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

राज्य सरकारने महाराष्‍ट्रात प्‍लास्टिकचा वापर रोखण्‍यासाठी कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले. मे २०२० पर्यंत संपूर्ण महाराष्‍ट्र प्रतिबंधित प्‍लास्टिकमुक्‍त करण्‍याचे लक्ष्‍य निश्चित करण्‍यात आले होते. या पार्श्वभूमीवर महापालिकेने मुंबईत प्‍लास्टिक वापरणाऱ्यांवर १ मार्च २०२०पासून कडक कारवाई करण्‍याचा निर्णय घेतला होता. मुंबईतील नागरिक, व्‍यापारी, फेरीवाले यांसह‍ सर्वांनी प्रतिबंधित प्‍लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले होते. जून २०१८पासून प्लास्टिकबंदीची घोषणा झाल्यापासून मार्च २०२०पर्यंत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि त्यांच्या पथकांनी मुंबईत सुमारे १६ लाख आस्‍थापनांना भेटी देऊन जवळपास ८६ हजार किलो प्‍लास्टिक जप्‍त केले होते. तर त्याअंतर्गत सुमारे चार कोटी ६५ लाख रुपयांचा दंडही वसूल करण्‍यात आला होता; मात्र पुढे कोविडमुळे या प्लास्टिकविरोधी कारवाईकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले. महापालिकेचा परवाना विभाग, बाजार विभाग आणि दुकान व आस्थापना विभागाच्या ३१० जणांची पथके तयार करून ही कारवाई केली जात होती; परंतु कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षे या कारवाईकडे दुर्लक्ष करण्यात आले. दरम्यान, कोरोनाचे रुग्ण आता कमी झाल्याने प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी पुन्हा सुरू केली जाणार आहे.

कोणत्या प्लास्टिकवर होती बंदी?

महाराष्‍ट्र शासनाच्‍या अधिसूचनेनुसार संपूर्ण महाराष्‍ट्रात प्‍लास्टिक (उत्‍पादन, वापर, विक्री, वाहतूक, हाताळणी साठवणूक)वर बंदी घातलेली आहे. या अंतर्गत प्‍लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या (हॅण्‍डल असलेल्या व नसलेल्या), प्‍लास्टिकपासून बनविण्यात येणाऱ्या व एकदाच वापरल्या जाणाऱ्या टाकाऊ वस्तू जसे की ताट, कप्स्, प्लेट्स, ग्लास, चमचे इत्‍यादी हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्‍लास्टिकच्या वस्तू, द्रव पदार्थ साठविण्यासाठी वापरात येणारे कप किंवा पाऊच व सर्व प्रकारचे अन्नपदार्थ, धान्य इत्‍यादी साठविण्यासाठी आणि पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्‍लास्टिक, प्‍लास्टिकचे वेष्टण यांच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे.

कसा आकारला जातो दंड

प्रतिबंधित प्‍लास्टिक आढळल्यास, प्रथम गुन्ह्यासाठी पाच हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपये, तिसऱ्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड व तीन महिन्यांची कैद अशी शिक्षा आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in