विधवांचा सन्मान झाला पाहिजे

विधवांचा सन्मान झाला पाहिजे

दररोज हसत हसत कामावर येणारी गुणा त्या दिवशी डोळ्यात पाण्याचा महापूर घेऊनच आली. काय झालं विचारलं तर म्हणाली, “वैनी, आमच्या घराच्या पलीकडच्या गल्लीत एक नवीन लग्न झालंय. ते नवरा नवरी कुठे तरी चालले होते. मंदिरात आसल बहुतेक. पर म्या लय वंगाळ काम केलं. म्या त्यांच्या आडवं गेलो बघा. त्यांनी कुणी काय म्हणलं न्हाई. पर म्या इधवा, धन्याबिगर राहणारी एक अशुभ बाई. म्या लई चुकीचं वागले. काय कळनाच बगा काय करू. माझ्यामुळं त्यांचं काय वाईट झालं होऊ नये बगा. सगळं चांगलंच होऊ दे.”

गुणा विधवा होती. त्यामुळे कुठल्याही शुभकार्यात सहभाग घेत नव्हती. विधवांनी आपल्या मर्यादेत राहावं, या मताची ती होती. ही मतं परंपरेने तिच्याकडे आली होती. विधवांनी समाजात कसं वागावं, याची लिखित चौकट आजही आहे. ती चौकट ओलांडू नये, यावर गुणा ठाम होती. बऱ्‍याच वेळा स्त्रिया स्वत:च स्वत:वर बंधनं लादून घेतात. काही स्त्रिया इतर स्त्रियांवर अत्याचार करतात. जुन्या विधवा स्त्रिया नव्याने विधवा झालेल्याना त्रास देतात. पतीचं आयुष्यातून निघून जाणं म्हणजे पत्नीच्या माथ्यावर पाप चिकटवणं होय. अशा प्रथा परंपरा नाकारता येत नाहीत.

त्या दिवशी कविता आणि धनेश खूप आनंदात होते. सकाळीच त्यांचं दिवसाभराचं प्लॅनिंग झालं होतं. ते दुपारी पिक्चरला जाणार होते. येताना त्यांच्या एका मित्राला भेटायला जाणार होते. रात्री सगळे जणं मिळून हॉटेलमध्ये जेवायला जाणार होते. घरी परतून आईस्क्रीमचा बेत होताच. ती दोघे सिनेमा बघण्यासाठी निघाले होते. त्या दिवशी कविताने सुंदर साडी नेसली होती. छान दिसत होती. तिने केलेल्या साध्याशाच मेकअपमुळे तिचं सौंदर्य खुललं होतं. त्यावेळी कविता जेमतेम ३० वर्षांची होती आणि धनेश ३२ वर्षांचा होता. जोडी घराबाहेर पडली. अतिशय सुखाच्या क्षणी त्या दोघांच्या आयुष्यात अचानक दु:खाने प्रवेश केला.

सिनेमासाठी निघालेल्या दोघांचा अपघात झाला. धनेशला गंभीर दुखापत झाली. तो या जगातून निघून गेला. कविताला थोडंसंच लागलं होतं, ती बरी झाली; परंतु त्याच्या जाण्याने तिचा गळा, तिचं मनगट, तिचं कपाळ, तिचा भांग, तिची अनामिका, पायाच्या अंगठ्याजवळचं बोट सगळं रिकामं झालं होतं. मेकअप उतरला होता. केसाला कंगवा लागला नव्हता. साडीच्या रंगातून हिरवा, लाल रंग उडाले होते. आयुष्य बेरंग झालं होतं. जिच्या शिवाय शुभकार्याची सुरुवात होत नसे, तिथे तिला प्रवेश नव्हता.

रंगारंग कवितेचं आयुष्य निरस झालं होतं. पांढऱ्‍या पायाची, अशुभ असे शिक्के बसले ते निराळेच. अशा कितीतरी कविता समाजात जीव मुठीत धरून वावरत आहेत. नुकताच विवाह झालेल्या मुलीचा नवरा गेला. शरीर सुख म्हणजे काय असतं याची कल्पनाही नसलेल्या मुलींच्या बाबतीत असं काही घडतं, तेव्हा तिच्या मानसिक शारीरिक अवस्थेची कल्पनाच न केलेली बरी. सवाष्ण सासू विधवा सुनेला आपलं मानत नाही. आपला मुलगा गेल्याबरोबर त्या सुनेला झालेलं दु:ख समजून न घेता तिच्यामुळे त्यांचा मुलगा गेला, असे आरोप करून तिला संपत्तीतून बेदखल करून घराबाहेर हाकलून दिलं जातं. अशी कितीतरी उदाहरणं सांगता येतील.

विधवांचे प्रश्न अस्वस्थ करून सोडणारेच आहेत. महाराष्ट्रात विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गावागावांत या निर्णयाचं स्वागत केलं जातंय. हा निश्चितच परिवर्तनीय निर्णय आहे. सरकार स्त्रियांना समान हक्क मिळावेत, यासाठी प्रयत्नशील आहे. गावागावांत विधवा प्रथा बंदचे ठराव होऊ लागले आहेत; परंतु अशा सामाजिक परिवर्तनासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली पाहिजे. अलीकडे मोठमोठ्या कार्यक्रमात विधवांना आम्ही सन्मानित करतो हे सांगण्यासाठी काही विधवांना स्टेजवर बोलवून कुंकू लावलं जातं. ती विधवा आहे हे आधी ओरडून सांगायची गरज नसते. तिचा सन्मान म्हणजे कुणाचा तरी शो ऑफ होतो. हे टाळता येऊ शकतं. त्यांच्या सन्मानासाठी त्याना विश्वासात घ्यायला हवं. त्यांना या गोष्टी हव्यात; पण त्यांची मनं न दुखावता त्या कशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवता येतील, हे विचारात घ्यायला हवं. वर्षानुवर्ष अपमान सहन केल्यानंतर आता म्हातारपणात कदाचित समाजाकडून मिळणारी अशी वागणूक त्याना नकोही असेल किंवा बदल स्वीकारायची काहींची तयारी नसेल. अशा वेळी त्यांच्या मानसिकतेचाही विचार व्हायला हवा. विधवा महिलांना सन्मान हा मिळायलाच हवा; परंतु फक्त सौभाग्य अलंकार देऊन प्रश्न सुटणार नाहीत. पुनर्विवाह करण्याचं स्वातंत्र्यही त्याना समाजाने द्यायला हवं. काही समाजात मुलगी कितीही लहान असली तरी तिचा पुनर्विवाह केला जात नाही. आयुष्यभर विधवा म्हणूनच तिला जगावं लागतं.

एका समाजात बालविवाह झालेली आरती सोळाव्या वर्षी विधवा होते. माहेरी राहू लागते. तिला छोटी बहीण असते. एक भाऊ असतो. आई-वडील असतात. अशा भरलेल्या कुटुंबात हक्काची मोलकरीण जणू घरच्यांना आयुष्यभरासाठी मिळते. ही कथा कुठल्या गरीब झोपडपट्टीतील नाही. उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. त्यांच्या समाजात पुनर्विवाह केले जात नाहीत. अशा मुलींना आई-वडिलांनी तरी प्रेमाने समजून घ्यावे. कोणतंच प्रेम जणू अशा मुलींच्या वाट्याला नसतं. समाजातून अशा प्रथांनाही विरोध व्हायला हवा.

खेडं असो की शहर. सगळीकडे विधवा प्रथा थोड्याफार फरकाने सारख्याच आहेत. त्यातल्या त्यात सौभाग्य अलंकार काढून ठेवणे, हा भाग सर्वसाधारणपणे सगळीकडे असतो, ते अलंकार घातल्याने तिला अपेक्षित सन्मान मिळेल? तसं असेल तर काही विधवा महिला हे दागिने उतरवत नाहीत. नवरा बरोबर असल्याची भावना त्यांच्यात कायम राहते. सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहेच. महिलांच्या मनातून मात्र आपण विधवा, अपशकुनी आहोत हे जात नाही. त्याचसाठी गावागावात सरकारच्या निर्णयाचा प्रामाणिक हेतू लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. समाजाने विधवांना सगळ्या क्षेत्रात सामावून घेतले पाहिजे. सरकारने, समाजाने एक सकारात्मक पाऊल उचलेले आहे. आता विधवांनीदेखील अबला म्हणून नाही तर सक्षम स्त्री म्हणून पुढे आले पाहिजे.

विधवांनी कपाळावरचं पुसलेलं कुंकू पुन्हा लावताना ज्ञानाची कास धरण्याचं स्वप्न उराशी बाळगावं. हातात नव्याने बांगड्या भरताना मनगटातील ताकद वाढवावी. आपल्या हातांकडे सुरक्षेची ढाल म्हणून बघावं. स्वत: आरशात न्याहाळताना स्वत:च्या देखण्या रूपाबरोबर सुंदर मनाचंही ऐकावं. खरंतर पती निधनानंतर फक्त एक पत्नी विधवा होत नसते. तर समाज बेढब होतो. नकारात्मकतेने फुगतो. अज्ञानाने काळवंडतो. चुकीच्या प्रथा परंपरेत गढून जातो. एकप्रकारे दृष्टिकोन हरवलेला समाज दृष्टिहीन होतो. आता सरकारनेच विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने निदान विधवांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल असा विश्वास बाळगायला काय हरकत आहे? विधवांचा सन्मान हाच सर्व स्रियांचा सन्मान आहे तो त्यांना मिळणं हा त्यांचा हक्क आहे. (लेखिका समुपदेशन तज्ज्ञ आहेत)

archanamulay5@gmail.com

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in