मुंबई : मालाड येथे आयेशा अखिल शेख या २३ वर्षांच्या महिलेची तिच्या पतीने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केली. हत्येनंतर आरोपी पती इन्तेफाक इद्रीस अन्सारी (२६) याने मालवणी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.
याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून इन्तेफाकला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी सहा वाजता मालाडच्या मालवणी अंबोजवाडीच्या मोन्या मशिदीजवळ घडली. या परिसरातील रुम क्रमांक २२२ मध्ये इन्तेफाक आणि आयेशा हे पती-पत्नी राहत होते. शनिवारी सकाळी इन्तेफाक हा मालवणी पोलीस ठाण्यात आला आणि त्याने तिथे उपस्थित पोलिसांना त्याने त्याच्या पत्नीवर चाकूने हल्ला केला. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली. या माहितीनंतर मालवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्तबंबाळ पडलेल्या आयेशाला पोलिसांनी तातडीने जवळच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. मात्र अधिक रक्तस्त्राव झाल्याने तिला डॉक्टांनी मृत घोषित केले. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.
इन्तेफाकची पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांच्यात क्षुल्लक कौटुंबिक कारणावरून सतत खटके उडत. शनिवारी सकाळी त्यांच्यात पुन्हा क्षुल्लक कारणावरून वाद झाला. या वादानंतर रागाच्या भरात त्याने आयेशाच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. त्यानंतर त्याने मालवणी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते. हत्येच्या कबुलीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. या गुन्ह्यांत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.